हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारताचा प्रथम पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर आता टीम इंडियाला यूएईकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. यूएईनं रोमांचक सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 1 धावेनं पराभव केला. या पराभवासह भारताच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना युएईनं 6 षटकांत 130 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ संपूर्ण षटकं खेळून 129/4 धावाच करू शकला. युएईकडून खालिद शाहनं शानदार फलंदाजी करत 10 चेंडूत 42 धावा ठोकल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
युएईनं पहिल्याच चेंडूवर आसिफ खानची विकेट गमावली होती. मात्र त्यानंतर खालिद शाहनं 10 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांसह 42 धावांची खेळी केली तर झहूर खाननं 11 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं नाबाद 37 धावा केल्या. भारताकडून स्टुअर्ट बिन्नीनं तीन बळी घेतले.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी रॉबिन उथप्पानं 10 चेंडूत 43 धावांची (तीन चौकार, पाच षटकार) आणि स्टुअर्ट बिन्नीनं 11 चेंडूत 44 धावांची (तीन चौकार, पाच षटकार) स्फोटक खेळी खेळली. मात्र यानंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतासाठी मनोज तिवारीनं 3 चेंडूत 10 धावा, केदार जाधवनं 6 चेंडूत 9 धावा आणि भरत चिपलीनं 6 चेंडूत 20 धावा केल्या.
शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी 32 धावा करायच्या होत्या. स्टुअर्ट बिन्नीनं षटकात पहिल्या पाच चेंडूंवर एक चौकार आणि चार षटकार मारून भारताचं आव्हान कायम ठेवलं होतं. भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या. मात्र बिन्नी हा फटका सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकला नाही. तो दोन धावा करताना धावबाद झाला आणि भारताला अवघ्या एका धावेनं पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा –
भारतीय चाहत्यांना लवकर व्हिसा मिळणार, चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तानची नवी खेळी
गुजरातनं रिटेन केलेल्या खेळाडूचं ऑस्ट्रेलियात शतक! लवकरच मिळू शकते कसोटीत संधी
केकेआरच्या रिटेंशन यादीत पहिल्या क्रमांकावर होतं श्रेयसचं नाव, पण…; वेंकी मैसूरने सांगितलं सर्वकाही