भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्याची पूर्ण योजना तयार केली आहे. इंग्लंड दौर्यावर भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. जवळ जवळ सर्वच प्रमुख खेळाडूंनी भारतातच कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ,कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआय सर्व खेळाडूंसाठी इंग्लंडमध्ये कोरोनाचा दुसरा डोस देणारा असल्याची बातमी समोर येत आहे.
येत्या 19 मे रोजी भारतीय संघाचे खेळाडू मुंबईत जमण्यापूर्वी तीन वेळा आरटी-पीसीआर चाचणी करतील. घरातच खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे.
सुत्रांनी माहिती दिली आहे की, खेळाडूंनी यापूर्वीच भारतात 18 वर्षांपेक्षा पुढील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय झाला तेव्हा कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना इंग्लंड येथेच दुसरा डोस दिला जाणार आहे. भारतीय खेळाडूंना मिळणारा लसीचा दुसरा डोस हा इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणार आहे.
बीसीसीआयचा यापूर्वीही प्रयत्न होता की खेळाडूंना इंग्लंडमध्येच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात यावा. आता खेळाडू लसीचा दुसरा डोस घेण्यास पात्र ठरल्यास त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
आगामी 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे होणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौर्यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असेल. तसेच रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारीचे संघात पुनरागमन झाले आहे. निवड समितीने अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नागवासवाला यांनाही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच संघासोबत इंग्लंडला जातील.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक
मोठी बातमी! ‘मिस्टर ३६०’ पुन्हा दिसणार नाही दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत; बोर्डाने केले स्पष्ट






