पुणे, 29 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या रामजी कश्यप याने केलेल्या अष्टपैलू खेळीसह पी नरसय्याचे आक्रमण यांच्या जोरावर चेन्नई क्विक गन्स संघाने मुंबई खिलाडीज संघाचा 16 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवताना प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला.मात्र या पराभवामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या विजयामुळे प्ले ऑफ साठी पात्र ठरणारा चेन्नई हा तिसरा संघ ठरला असून त्यांनी तेलगु योद्धाजला सुद्धा प्ले ऑफ मधील स्थान भक्कम करण्यासाठी मदत केली आहे. ओडिशा जगरनट्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांनी प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चेन्नई क्विक गन्स संघाने आजचा सामना मुंबई विरुद्ध 58-42 असा जिंकून अखेरच्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या मुंबईच्या आशा संपुष्टात आणल्या.
स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक व बचवपटू असा लौकिक मिळवणाऱ्या कश्यपने 6मिनिटे 37 सेकंद संरक्षण करताना 11गुणांची नोंद केली. नरसय्याने पाच गडी बाद करताना 14 गुणांची कमाई करून त्याला उत्कृष्ट साथ दिली. त्यातील चार गडी नेत्रदीपक डाईव्हवर बाद केले.
गेल्या सामन्यातही दणदणीत विजय मिळवणाऱ्या चेन्नईने आजच्या संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. मध्यतरल आघाडी गेहणाऱ्या चेन्नई संघाने प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करायला लावला.
तिसऱ्या सत्राअखेर 54-24 अशी आघाडी घेऊन चेन्नई संघाने एकतर्फी विजयाची निश्चिती केली होती.
मुंबई खिलाडीज संघाने अंतिम सत्रात 14 गुणांची नोंद केली. परंतु कर्णधार अमित पाटील (नाबाद 3मिनिटे 21सेकंद) आणि कश्यप यांनी चेन्नईच्या विजयाची निश्चिती केली.मुंबई संघाकडून गजानन शेनगलने 11गुण मिळवून झुंज दिली. तत्पूर्वी अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या लढतीत मुंबईने संरक्षण स्वीकारल्यावर अभिषेक पाथरोडेने 2मिनिटे 37 सेकंद संरक्षण करताना मुंबईला 2 बोनस गुण मिळवून दिले. नरसय्याने त्याला अप्रतिम स्काय डाईव्ह वर बाद केल्यानंतर चेन्नईने पहिल्या संत्रा अखेर 26-02 अशी आघाडी मिळवली.
दुसऱ्या सत्रात कश्यपने 3 मिनिटे 23 सेकंद संरक्षण करताना मुंबईचे दोन वझीर निष्प्रभ ठरवले. कश्यपचे चार बोनस गुण आणि प्रीतम चौगुले(2.41मिनिटे) व महेश शिंदे(2.51मिनिटे)यांनी दिलेल्या दोन बोनस गुणांमुळे मुंबईला केवळ 18 गुणांची संधी देताना चेन्नईने दुसऱ्या सत्ता अखेर 32-20 अशी आघाडी मिळवली होती.