पुणे, 16 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेत तिसऱ्या दिवशी आदर्श मोहितेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर तेलगु योद्धाज संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 21 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मोहिते याने 3 मिनिटे 43 सेकंद सरंक्षण करताना आक्रमणात 10 गडी बाद करून तेलगु योद्धाज संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 68-47 असा विजय मिळवला.
याशिवाय प्रसाद राद्ये याने 13 गुणांची नोंद करताना मोहितेला उत्कृष्ट साथ दिली. तसेच रोहन शिंगोटेने 10 गडी टिपताना तेलगु योद्धाजच्या विजयात महत्त्वाचचा वाटा उचलला.
राजस्थान वॉरियर्स कर्णधार मझहर जमादारने 17 गुणांची नोंद करताना एकाकी झुंज दिली. सुशांत काळढोने याने 4 गडी बाद करून 9 गुणांची कमाई केली.
याआधी, राजस्थान वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून बचाव स्वीकारला. तेलगु योद्धाज संघाने दोन खेळाडू वझीरात रूपांतर करताना पावर प्ले ची जोरदार सुरुवात केली.
राजस्थानच्या अक्षय गंनपुळे आणि गोचीड यादव यांनी तेलगु योद्धाज संरक्षणाची कसोटी पहिली आणि 2 बोनस गुणही मिळवले. परंतु तेलगु योद्धाज संघाने राजस्थानची पहिली तुकडी 2 मिनिटे 36 सेकंदात तंबूत परतावली व 24-02 अशी आघाडी घेतली. राजस्थानने आक्रमणात चांगली कामगिरी करताना प्रत्युत्तर दिले. परंतु मोहितेने नाबाद 3मिनिटांचे संरक्षण करताना तेलगु योद्धाज पहिल्या डावात 30-20 अशी आघाडी मिळवून फिली. तेलगु योद्धाजने दुसऱ्या डावातील पहिल्या 7 मिनिटात 36 गुण मिळवताना सामन्यावर घेतलेली पकड कायम राखली. तेलगु योद्धाज संघाने आपली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.
गुजरात जायंट्स विरुद्ध ओडिशा जुगरनट्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे.