पुणे, 24 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत दुर्वेश साळुंखे आणि अविक सिंगा यांच्या संरक्षणातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुंबई खिलाडीज संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 56-42 असा पराभव करताना आपली पराभवाची मालिका खंडित करून विजयपथावर पुनरागमन केले. तर, ओडिशा जुगरनट्स संघाने 10 गुणांनी आव्हासक विजय मिळवताना चेन्नई क्विक गन्स संघाची विजयी घौडदौड रोखून सनसनाटी निकालाची नोंद केली.
राजस्थान संघांचा मात्र सलग पाचवा पराभव ठरला, तर सहा सामन्यात दुसऱ्या विजयाची नोंद करणाऱ्या मुंबईसाठी दुर्वेश साळुंखे आणि अविक सिंगा यांनी दुसऱ्या आणि चौथ्या सत्रात बोनस गुणांची नोंद करून राजस्थानच्या विजयाची शक्यता संपुष्टात आणली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईकडून आक्रमणात अविक सिंगाने 8 तर साळुंखेने 4 गुणांची कमाई केली. श्रीजेशने सात गुण मिळवताना त्यांना साथ दिली. राजस्थान कडून दिलराज सिंग सेंगर याने संरक्षणात 4 बोनस गुण तर बी निखिलनें आक्रमणात 8 गुण मिळवले.
त्याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. त्यांची पहिली तुकडी 2मिनिटे 20 सेकंदात तंबूत परतली. दुसऱ्या तुकडीतील अक्षय गणपुळेने 2मिनिटे 37 सेकंदात आपल्या संघाला बोनस गुण मिळवून दिला. परंतु राजस्थानची तिसरी तुकडी 1मिनिट 59 सेकंदात परतल्याने मुंबई ला पहिल्या सात मिनिटाअखेर 23-02 अशी आघाडी मिळवता आली.
दुसऱ्या सत्रात राजस्थानने पहिल्या मिनिटातच अनेक फाइल केले त्यामुळे मुंबईची पहिली तुकडी 2मिनिटापेक्षा अधिक काळ टिकली. राजस्थानने मुंबईची दुसरी 1मिनिटे 1सेकंदात परतावली. मात्र तिसऱ्या तुकडीतील साळुंखे आणि अविक सिंगा यांनी मुंबईला बोनस गुण मिळवून दिला. तरीही राजस्थानकडे मध्यन्तरला 27-25 अशी आघाडी होती.
तिसऱ्या सत्रात पठाणने मोहम्मद तासीनला बाद करून मुंबई ला बरोबरी साधून दिली. तर श्रीजेशने निखिल आणि माझहर ला बाद करून मुंबईला 31-27 असे आघाडी मिळवून दिली. सुरेश सावंत आणि ऋषीकेश मुरताडे यांनी 3मिनिटे 13 सेकंद संरक्षण करताना राजस्थान ला 4 बोनस गुण मिळवून दिले. तरीही तिसऱ्या संत्रा अखेर मुंबई 46-31 अशी आघाडीवर राहिली.
शेवटच्या सात मिनिटात मुंबईच्या पहिल्याच तुकडीने 4 बोनस गुण मिळवुन आपल्या संघाला 50-33 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अविक आणि साळुंखे यांनी मुंबईला चार बोनस गुण मिळवून दिल्यामुळे राजस्थान वरील दडपण वाढले त्यातच मुंबईच्या दुसऱ्या तुकडीने अडीच मिनिटपेक्षा अधिक काळ बचाव करताना आणखी बोनस गुणांची कमाई केली व तिथेच मुंबईचा विजय निश्चित झाला
पहिल्या सामन्यात निलेश जाधवने ओडिशा संघाकडून सर्वोत्तम कामगीरी करताना 15 गुणांची कमाई केली व यात पाच अप्रतिम डाईव्हचा समावेश होता. कर्णधार मिलिंद चावरेकर आणि सूरज लांडे यांनी अनुक्रमे 9 आणि 8 गुण टिपून त्याला चांगली साथ दिली.
चेन्नई क्विक गन्स संघाकडून पी नरसय्या आणि मनोज पाटील यांनी प्रत्येकी 8 गुण नोंदवले, तर ओडिशा संघाकडून एम के गौतम आणि जगन्नाथ मुरुमु यांनी अनुक्रमे 2मिनिटे 33 सेकंद आणि 2मिनिटे 59 सेकंद संरक्षण करताना कडवी झुंज दिली. मात्र ओडिशा संघाने पहिल्या सात मिनिटांत चेन्नई संघाला वेगाने गुण मिळवण्यापासून रोखत त्यांची आघाडी 19-04 अशी रोखली.दुसऱ्या सत्रात चेन्नईच्या रामजी कश्यपने 2मिनिटे 23 सेकंद संरक्षण करूनही ओडिशाने वेगवान आक्रमणाच्या साहाय्याने पहिल्या डावा अखेर 28-19 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
सुभाषिश संत्राने ओडिशा कडून चार बोनस गुणांसह 3मिनिटे 4 सेकंद संरक्षण केल्यामुळे तिसऱ्या सत्रात चेन्नई क्विक गन्स संघाला केवळ 37-32 अशी पाचच गुणांची आघाडी घेता आली.मात्र अखेरच्या सात मिनिटात जबरदस्त आक्रमण करताना ओडिशा संघाने तब्बल 19 गुणांची कमाई केली . त्यामुळे त्यांना 51-41 अशा फरकने विजय मिळवता आली.
गुरुवारी, पहिला सामना ओडिशा जुगरनट्स विरुद्ध राजस्थान वॉरियर्स तर दुसरा सामना गुजरात जयंट्स विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात होणार आहे.