पहिल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सच्या विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई खिलाडीज संघ शुक्रवारी (१९ ऑगस्ट) होणाऱ्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स संघाविरुद्ध विजयी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई खिलाडीज संघाला आतापर्यंत एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते म्हणाले की, “आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. परंतु गुजरात संघाने आमच्या पेक्षा सरस कामगिरी केली आणि ते मान्य करणे भागच आहे. आधीच्या सामन्यातील परभवातून सावरण्यासाठी आणि आमच्या चुका सुधारण्यासाठी आम्हाला आणखी एक दिवसाचा वेळ मिळाला आहे. पुढच्या सामन्यात आम्ही चेन्नई क्विक गन्स संघाशी लढत देणार असून आम्ही आखलेले डावपेच मैदानावर प्रत्यक्षात आणणे हेच आमचे लक्ष्य आहे. आमच्या खेळाडूंनी दाखवलेली ऊर्जा कौतुकास्पद आहे. परंतु आम्हाला कठोर परिश्रम केले पाहिजेत आणि विजयासाठीच खेळ केला पाहिजे.”
दोन्ही संघ पहिल्यांदाच या मौसमात आमने सामने येणार आहेत.
चेन्नई क्विक गन्स संघ आपल्या पहिल्या विजयानंतर आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक आहे. बुधवारी झालेल्या तिसऱ्या दिवशीच्या लढतीत चेन्नई संघाने तेलगु योद्धाज संघाचा पराभव करून त्यांची विजयी घौडदौड रोखली.
चेन्नई क्विक गन्स संघाचा कर्णधार अमित पाटील म्हणाला की, “पहिल्या विजयामुळे संघातील सर्व खेळाडू आनंदी आहेत. यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला असून सांघिक कामगिरीमुळे आम्ही हे करू शकलो. यापुढे प्रत्येक सामना जिंकण्याचे आमचे लक्ष्य असणार आहे. प्रतिस्पर्धी संघ विजयी अथवा पराभुत होऊन जरी आमच्यापुढे आला तरी आम्ही गाफील राहणार नाही आणि प्रत्येक सामन्यात आम्ही सर्वोत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करू.”
याशिवाय शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात, मझहर जमादार कर्णधार असलेल्या राजस्थान वॉरियर्स संघ ओडिशा जुगरनट्सविरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असणार आहे.
देशातील पहिल्या फ्रॅंचायझी आधारित खो खो लीग स्पर्धा चाहत्यांसाठी एका नव्या रुपात आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी, याच स्पर्धेच्या नव्या रूपाचे दर्शन व आनंद कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या अविनाश साबळे याने देखील उपस्थित राहून घेतला आहे. त्याच्या उपस्थितीमुळे मैदानावरील खेळाडूंना प्रेरणा मिळाली.
यावेळी साबळे म्हणाला की, “अल्टीमेट खो खो स्पर्धेचे नवे रूप, खेळाचा असलेला वेग आणि आव्हाने पाहून मी भारावून गेलो आहे. या खेळाडूंना पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले.” साबळे याने बर्मिंघम येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत 300मीटर स्टीपलचेस पुरुष शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करताना ऐतिहासिक पदक पटकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेतही टीम इंडियाची बल्ले-बल्ले; पहिली वनडे १० गड्यांनी खिशात
खळबळजनक! रवी शास्त्रींवर टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचे गंभीर आरोप
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच






