मुंबई । पाकचा फलंदाज उमर अकमल याच्यावर सहानुभूती दाखवत तीन वर्षाची बंदी बुधवारी कमी करण्यात आली. परंतु, या निर्णयावर तो समाधानी नाही आणि निलंबन पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तो लढा देणार आहे.
उमर अकमलची बंदी आता फेब्रुवारी 2020 ते ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असेल. न्यायाधीश फकीर मोहम्मद खोखर यांनी या 30 वर्षीय खेळाडूवरील बंदी कमी केली. पण हा फलंदाज मात्र यावर खूष नाही आणि पुन्हा अपील करण्याची त्याची इच्छा आहे.
या निर्णयानंतर उमर अकमल याने येथील स्थानिक प्रसार माध्यमांना सांगितले की, ”माझ्या आधीही असे अनेक क्रिकेटपटू होते ज्यांनी भ्रष्टाचार केला होता. पण माझ्यासारखी कोणालाही शिक्षा झाली नाही. मी पुन्हा एकदा अपील करेन की माझी शिक्षा आणखी कमी करावी. या निलंबनामुळे मी खूश नाही.”
खोखर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अकमल यांच्याविरूद्ध खटला सिद्ध झाला होता. परंतु त्यांनी सहानुभूती दाखवून बंदीचा कालावधी कमी केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, ”सहानुभूतीपूर्वक न्यायाधीशांनी अमर अकमल यांच्यावरील बंदी एक वर्ष आणि सहा महिन्यांनी कमी केली. अकमलवर एप्रिलमध्ये तीन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्याने आपली चूक कबूल केली होती पण त्याने आपली बाजूही बरोबर दाखवण्याचा प्रयत्न केला.”






