2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक होता. विजेतेपदाच्या चित्तथरारक लढतीत प्रत्येक क्षणी पारडं बदलत होतं. कधी यजमान इंग्लंड वरचढ ठरत होता, तर कधी न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत होता. अखेर सामना बरोबरीत सुटला, ज्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आला. मात्र, येथेही दोन्ही संघ बरोबरीत राहिले, ज्यानंतर बॉउंड्री काउंटच्या नियमाचा आधार घेत इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं.
आता पाच वर्षांनंतर या विश्वचषक फायनलबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात पंचाच्या एका चुकीच्या निर्णयाची महत्त्वाची भूमिका होती!
झालं असं की, अंतिम सामन्यात इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. क्रिजमध्ये परतण्यासाठी बेन स्टोक्सनं डाईव्ह मारला, मात्र मार्टिन गप्टिलनं फेकलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागला आणि चेंडू सीमारेषेपार गेला. यानंतर अंपायरनं इंग्लंड संघाला 6 धावा (2 धावा आणि चौकाराच्या चार धावा) दिल्या, ज्यामुळे इंग्लिश संघाचं काम अधिक सोपं झालं.
आता कथेत ट्विस्ट असा होता की, आयसीसीच्या नियमांनुसार या ठिकाणी इंग्लंड संघाला 5 धावाच मिळायला हव्या होत्या. याचं कारण स्टोक्स आणि रशीद यांनी दुसरी धाव पूर्ण केली नव्हती. त्या सामन्यात पंचाची भूमिका निभावणाऱ्या मरायस इरास्मस यांनी निवृत्ती घेतल्यानंतर अंतिम सामन्यात झालेली ही मोठी चूक उघड केली आहे.
विजेतेपदाच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या इरास्मस यांनी टेलिग्राफ क्रिकेटशी बोलताना सांगितलं की, “फायनलनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्यासाठी हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी कुमार धर्मसेनाही (दुसरे पंच) तेथे आले. त्यांनी मला सांगितलं की, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा मला याची जाणीव झाली. त्यावेळी मैदानावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि इंग्लंडला सहा धावा दिल्या. आम्ही लक्ष दिलं नाही की, दोन्ही फलंदाजांनी क्रिज पार केली नव्हती.”
महत्त्वाच्या बातम्या-
धावा समान, मात्र तरीही विराट कोहलीऐवजी रियान परागकडे ऑरेंज कॅप का? जाणून घ्या
अरे चाललंय काय! एक चेंडू रोखण्यासाठी चक्क पाच जण धावले…व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
आयपीएलच्या चीअरलीडर्सचा पगार किती असतो? एका सामन्यासाठी किती मानधन मिळतं? जाणून घ्या