आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत युवा फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा गोलंदाज उमरान मलिक याने देखील आपल्या गतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या कामगिरीचे फळ म्हणून आता त्याला एक मोठी संधी मिळाली आहे.
उमरान मलिकची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तो या दौऱ्यावर भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. तर या संघाचे नेतृत्व गुजरात संघाचा फलंदाज प्रियांक पांचालकडे देण्यात आले आहे. भारतीय अ संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २३ नोव्हेंबर सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने मंगळवारी (९ नोव्हेंबर) १४ सदस्यीय संघाची घोषणा केली.
या मालिकेतील ४ वनडे सामने ब्लोएमेंफोंटेनच्या मैदानावर पार पडणार आहे. २१ वर्षीय उमरान मलिकने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत केवळ १ प्रथमश्रेणी सामना तर ८ टी -२० सामने खेळले आहेत. उमरान मलिकचे वडील जम्मू आणि काश्मीरमध्ये फळ विक्रेते आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना त्याने आपल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलेले. त्याने १५२.९६ गतीचा चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेत तो सर्वात जलद चेंडू फेकणारा गोलंदाज ठरला होता. तसेच युवा भारतीय गोलंदाज १५० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करतोय हे पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील भलताच खुश झाला होता. त्याने उमरान मलिकचे कौतुक देखील केले होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी असा आहे भारतीय अ संघ
प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टिरक्षक), के गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उमरान मलिक, ईशान पोरेल, अरजान नागासवाला