क्रिकेटमध्ये जवळपास प्रत्येक सामन्यात नवीन विक्रम मोडणे आणि प्रस्थापित होणे घडत असते. यातील काही विक्रम छोटे असतात जे नजरेत येत नाहीत. मात्र, काही असे विक्रम असतात जे नेहमी सर्वांच्या लक्षात राहतात. आजकालच्या टी20 च्या जमान्यात विक्रम बनणे आणि मोडणे अगदी सहजतेने शक्य होते. क्रिकेटचा इतिहास 145 वर्षांचा झाला आहे. यादरम्यान असे काही विक्रम नोंदवले गेले जे मोडणे, अद्याप शक्य झाले नाही. तसेच भविष्यातही हे विक्रम मोडणे कठीण आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच विक्रमांबाबत जाणून घेणार आहोत, जे कदाचित कधीही तुटले जाणार नाहीत.
ब्रॅडमन यांची सरासरी
क्रिकेट इतिहासातील आजवरचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख होतो ते ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन. डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या नावे असंख्य क्रिकेट रेकॉर्ड आहेत. त्यापैकीच एक रेकॉर्ड म्हणजे त्यांच्या सरासरीचा. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 52 टेस्ट मॅचेस खेळल्या. त्यामध्ये 99.94 च्या विस्मयकारक सरासरीने 6996 रन्स काढले. कमीत कमी 10 टेस्ट खेळलेल्या कोणत्याही बॅटरला या सरासरीच्या जवळपासही जाता आले नाही. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही आजपर्यंत 60 पेक्षा जास्तच्या सरासरीने बनवू शकले नाही. विशेष म्हणजे त्यांनी झळकावलेल्या 19 शतकांपैकी 12 शतके 200 पेक्षा जास्त रन्सची होती. त्यांचे हे दोन रेकॉर्ड भविष्यातही कदाचित तुटणार नाहीत.
मुरलीधरनच्या 1347 विकेट्स
क्रिकेटविश्वाने आजवर अनेक महान बॉलर्स पाहिले. प्रत्येकाची आपली वेगळी प्रतिष्ठा होती. मात्र, क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे असं म्हणतात. आकड्यांच्या या खेळात जो बॉलर सर्वोच्च स्थानी पोहोचला तो म्हणजे श्रीलंकेचा ऑल टाईम ग्रेट स्पिनर मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan). मुरलीधरनने आपल्या 19 वर्षांच्या इंटरनॅशनल करियरमध्ये 1347 विकेट्स घेतल्या. यात टेस्टमधील 800 व वनडेतील 534 विकेट्सचा समावेश आहे. टी20 तही 13 विकेट्स त्याने घेतलेल्या. सध्याचे बॉलर्स सातत्याने दुखापतग्रस्त होत असतात अथवा विश्रांती घेत असतात. त्यामुळे ते जास्त काळ इंटरनॅशनल क्रिकेट खेळत नाहीत. या कारणाने भविष्यात त्याच्या या वर्ल्डरेकॉर्डच्या आसपासही कोणी जाऊ शकणार नाही.
ऑलराऊंडर जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराऊंडर जॅक कॅलिस (Jacques Kallis) हा क्रिकेट इतिहासातील सर्वात परिपूर्ण क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. जॅक कॅलिसने टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ओपनर म्हणून बॅटिंग करताना, केवळ रन्सच नाहीत काढले तर विकेट्सही मिळवल्या. 1995 ते 2014 या काळात तब्बल 166 टेस्ट, 328 वनडे आणि 25 टी20 मॅचेस खेळल्या. कॅलिसने तीन फॉरमॅटमध्ये मिळून 25535 रन्स आणि 577 विकेट्स घेतल्या. क्रिकेट इतिहासात इतर कोणत्याही ऑलराऊंडरचे इतके समृद्ध करियर राहिले नाही. त्याचा हा रेकॉर्ड भविष्यात तुटेल याबाबत शंका आहे.
जिम लेकर
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम स्पिनर्सपैकी एक असलेले इंग्लंडचे जिम लेकर (Jim Laker) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा एका इनिंगमध्ये विरोधी संघाचे सर्व 10 विकेट्स घेणारे बॉलर म्हणून सर्वांना परिचित आहेत. 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मँचेस्टर टेस्टमध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली. त्यांच्या या पराक्रमाची पुढे भारताच्या अनिल कुंबळे व न्यूझीलंडच्या एजाज पटेलने बरोबरी केली. मात्र, त्याच मॅचमध्ये त्यांनी बनवलेल्या दुसऱ्या एका विश्वविक्रमाच्या कोणी जवळ येऊ शकले नाही. तो होता एका मॅचमध्ये 19 विकेट्स घेण्याचा. लेकर यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याआधी पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट्स घेतलेल्या. त्यांचे त्या संपूर्ण मॅचमधील बॉलिंग स्टॅटस होते 68 ओव्हर्स, 27 मेडन, 90 रन्स व 19 विकेट्स. या आकडेवारीच्या नजीक 66 वर्षात कोणीही जाऊ शकला नाही. भविष्यात हा विक्रम देखील मोडण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
सुपर ओव्हरमध्ये मेडन ओव्हर
इंटरनॅशनल क्रिकेटव्यतिरिक्त अधिकृत टी२० मधीलही असा एक रेकॉर्ड आहे जो तुटणे केवळ अशक्य आहे. तो म्हणजे सुपर ओवरमध्ये मेडन ओवर टाकण्याचा. 2014 कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये रेड स्टील विरुद्ध गयाना अमेझॉन वॉरियर्स ही मॅच खेळली गेलेली. मॅच दोन्ही संघाच्या बॅटिंगनंतर 118-118 रन्सवर बरोबरीत राहिली. मॅचचा निकाल सुपर ओवरमध्ये घेण्यात आला. त्यामध्ये गयानासाठी सुपर ओवर टाकताना सुनील नारायण (Sunil Narine) याने निकोलस पूरनला चार बॉलवर एकही रन काढू दिला नाही. पाचव्या बॉलवर त्याला आणि सहाव्या बॉलवर रॉस टेलरला आउट करत त्याने ही सुपर ओवर मेडन टाकली. भविष्यात क्रिकेटमध्ये असा चमत्कार होणे केवळ अशक्य आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
दुर्दैवी! दुखापतींमुळे ‘या’ क्रिकेटपटूंच्या करिअरला कायमचा लागला ब्रेक, यादीत एका भारतीयाचाही समावेश