भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा विश्वविजेता कर्णधार यश धूल (Yash Dhull) सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत धुमाकूळ घालतो आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत त्याने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. लवकरच तो आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) हंगामात आपल्या प्रदर्शनाची छाप सोडताना दिसेल. तत्पूर्वी त्याने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरण्यासाठी (Yash Dhull On IPL 2022) आपण उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. यशला मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने ५० लाख रुपयांना विकत घेतले होते.
युवा फलंदाज यश आगामी आयपीएल हंगामात इंग्लंडच्या खतरनाक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer)चा सामना करण्यासाठी उत्सुक आहे. आर्चरकडे चांगली गती आणि तो उल्लेखनीय व्हेरिएशनसह गोलंदाजी करतो. याच कारणामुळे यशला आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे.
परंतु यशला त्यासाठी अजून एक वर्ष वाट पाहावी लागेल. कारण आर्चर दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळणे कठीण आहे. अशात तो २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. मुंबईने मेगा लिलावात त्याला ८ कोटींच्या रक्कमेला विकत घेतले आहे.
याबरोबरच यशने दिल्ली संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्यासोबत मोठी भागिदारी करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मला दिल्ली संघाकडून खेळताना वॉर्नरसोबत मोठी भागिदारी करायची आहे. मला अपेक्षा होती, या हंगामात दिल्लीचा संघ मलाच लिलावात खरेदी करेल. कारण मी त्यांच्या अकादमीचा भाग आहे. मी आता दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीखाली खेळण्यासाठी उत्सुक आहे.”
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी
यश धूलने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ठ नेतृत्वासह अप्रतिम फलंदाजी देखील केली होती. त्याने ४ सामन्यात ७६.३३ च्या सरासरीने २२९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. शतक पूर्ण करताच तो, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नंतर तिसरा भारतीय कर्णधार ठरला होता. आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहन बागानचे लक्ष्य ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चितीचे; ओदिशाला देणार आव्हान






