विश्वचषक 2023 स्पर्धा संपली असली, तरीही क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करणारी एक स्पर्धा सुरूच आहे. ती म्हणजेच लीजेंड्स लीग क्रिकेट, जगभरातील निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात. लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतील आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. यातील चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने कहर केला. यावेळी त्याने असा काही फटका मारला की, थेट बॅटच तुटली. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 (Legends League Cricket 2023) स्पर्धेतील चौथा सामना रांचीत खेळला गेला. या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध भिलवारा (Gujarat Giants vs Bhilwara Kings) किंग्स आमने-सामने होते. हा थरारक सामना गुजरातने 3 धावांनी जिंकला. यावेळी नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. यामध्ये ख्रिस गेल (Chris Gayle) याचे सर्वाधिक योगदान होते. त्याने अवघ्या 27 चेंडूत 52 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता.
ख्रिस गेलची बॅट तुटली
गुजरातच्या डावातील सहावे षटक रायन साईडबॉटम टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर रिचर्ड लेवीने एक धाव घेऊन स्ट्राईक ख्रिस गेलला दिली. यावेळी गेलने रायनच्या दोन चेंडूवर खणखणीत षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर जोरदार फटका मारत चेंडू चौकारासाठी पाठवला. यावेळी झाले असे की, गेलने ताकदीने चेंडू फटकावताच त्याच्या बॅटचे दोन तुकडे (Chris Gayle Bat Broken) झाले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत गेल त्याच्या तुटलेल्या बॅटच्या हँडलसोबत दिसत आहे.
Universe Boss: Breaking bats and records since forever!
.
.#LegendsOnFanCode @llct20 @giants_gujarat @henrygayle pic.twitter.com/w2Qimp2xqO— FanCode (@FanCode) November 22, 2023
गेलने 23 चेंडूत झळकावलं अर्धशतक
या सामन्यात गेलने 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सामन्यादरम्यान एकेवेळी तो 18 चेंडूत 26 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने आक्रमक खेळ करत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. साईडबॉटमच्या सहाव्या षटकात त्याने 25 धावा लुटल्या. यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचाही समावेश होता.
गुजरातचा विजय
सामन्यादरम्यान नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात जायंट्स संघाने 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भिलवारा किंग्स संघ 7 विकेट्स गमावत 169 धावाच करू शकला. यावेळी भिलवाराकडून लेंडल सिमन्स याने वादळी फलंदाजी केली. त्याने यावेळी 61 चेंडूत नाबाद 99 धावा कुटल्या. यामध्ये 3 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. (universe boss chris gayle smashes four with a broken bat ryan sidebottom gujarat giants vs bhilwara kings legends league cricket see video)
हेही वाचा-
पंड्या नाही, तर टी20 WCमध्ये ‘या’ खेळाडूला बनवावे भारताचा कॅप्टन; गंभीरने सुचवले नाव, विराटबद्दल म्हणाला…
पुढच्या वर्ल्डकपवेळी किती वयाचे असतील दिग्गज भारतीय खेळाडू? पाहा चक्रावणारे आकडे, एक तर चाळिशीत…