आयपीएलचा १३ वा हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
कोहलीच्या नावावर झाला नकोसा विक्रम
या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. याचा मोठा फटका बेंगलोर संघाला बसला. केएल राहुलने या सामन्यात ६९ चेंडूत तब्बल १३२ धावा केल्या. यात त्याने ७ षटकार आणि तब्बल १४ चौकार मारले. याच सामन्यात राहुलचे दोन झेल सोडल्याने विराटने आयपीएलच्या मागील ६ हंगामात तब्बल १५ झेल सोडण्याचा लाजीरवाणा पराक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
आयपीएलच्या गेल्या ६ हंगामात सर्वाधिक झेल सोडणारे क्षेत्ररक्षक
आयपीएलच्या मागील ६ हंगामात विराटने १५, रविंद्र जडेजाने १४, रॉबिन उथप्पाने १२ तर हरभजन सिंगने १२ झेल सोडले आहेत. यातील विराट, रॉबिन उथप्पा आणि रविंद्र जडेजा हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. तरीही हा नकोसा विक्रम या तीन खेळाडूंच्या नावावर झाला आहे.
आयपीएलच्या १३व्या हंगामात शतक झळकावणारा केएल राहुल हा पहिलाच फलंदाज
आयपीएलच्या १३व्या हंगामातील सहाव्या सामन्यात पहिले शतक केएल राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने हे शानदार शतक झळकावले असून २०१९ च्या हंगामातील पहिले शतक संजू सॅमसनने झळकावले होते.