महिला प्रीमियर लीग 2026 साठी सर्व 5 संघ आता सज्ज झाले आहेत. आगामी हंगामासाठी यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. फ्रँचायझीने मेग लॅनिंगची कर्णधारपदी निवड केली आहे. वास्तविक, आगामी हंगामासाठी दीप्ती शर्माकडे कप्तानी सोपवली जाईल अशी चर्चा होती, परंतु तिला डावलण्यात आले आहे. मेग लॅनिंगने आतापर्यंत महिला प्रीमियर लीगचे तिन्ही फायनल खेळले आहेत. यापूर्वी ती दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार होती.
यूपी वॉरियर्सने सोशल मीडियावर आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाच्या लॅनिंगने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते. तिने तीन वर्षे या फ्रँचायझीसाठी आपली सेवा दिली आहे. तिच्या नेतृत्वाखाली दिल्लीने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. यूपी वॉरियर्सला अद्याप महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. 2023 मध्ये हा संघ प्ले-ऑफपर्यंत पोहोचला होता, तर दुसऱ्या हंगामात संघ चौथ्या स्थानावर होता. 2025 मध्ये यूपीने 8 पैकी केवळ ३ सामने जिंकले होते. मात्र, या हंगामात संघ आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
यूपी वॉरियर्सने लॅनिंगला डब्ल्यूपीएल 2026 च्या लिलावात 1.90 कोटी रुपयांना खरेदी केले होते. WPL मध्ये तिने आतापर्यंत 27 सामन्यांत कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये संघाने 17 सामने जिंकले आहेत, तर 10 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, लॅनिंगने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला तब्बल 7 विश्वविजेतेपदं मिळवून दिली आहेत.






