२७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारताचा ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मर्यादीत षटकांच्या मालिका झाल्यानंतर १७ डिसेंबरपासून या दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी भारताचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या तंदुरुस्तीचा प्रश्न भारतीय संघाला सतावत आहे. मात्र, आता बीसीसीआयने त्यांच्या तंदुरुस्तीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
११ डिसेंबरला होणार रोहितची तंदुरुस्ती चाचणी
रोहित शर्मा युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे सध्या तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. त्यामुळे आता ११ डिसेंबरला त्यांची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील त्याच्या सहभागाबद्दल निर्णय घेण्यात येईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी रोहितचा भारतीय संघात समावेश नाही, पण त्याची कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. पण आता तो ही कसोटी मालिका खेळणार की नाही, हे ११ डिसेंबरला ठरेल.
वडील आजारी असल्याने रोहित मुंबईला गेला होता – बीसीसीआय
आयपीएल २०२० चा विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकल्यानंतर रोहित भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला न जाता थेट मुंबईला आला होता. त्याच्या या निर्णयामागचे कारण काय होते, याबद्दल बरीच चर्चा झाली होती. पण आता बीसीसीआयने याबाबत खुलासा केला आहे. बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार रोहितचे वडील आजारी असल्याने तो आयपीएलनंतर लगेचच मुंबईला परतला होता. पण आता त्याचे वडील ठिक आहेत.
इशांत शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा बाहेर पडला आहे. त्यालाही आयपीएल २०२० दरम्यान दुखापत झाली होती. बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार इशांत दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. मात्र तो देखील सध्या एनसीएमध्ये त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. त्यामुळे तो आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.