२०२६ टी-२० वर्ल्ड कपचा पहिला दिवस अत्यंत अनपेक्षित ठरला आहे. दिवसाच्या पहिल्या दोन सामन्यांत स्कॉटलंड आणि नेदरलँड्सला विजय मिळवता आला नसला, तरी त्यांनी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची अवस्था बिकट केली होती. आता तीच किमया अमेरिकेने (USA) करून दाखवली आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अमेरिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा दुसऱ्याच षटकात स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माची विकेट पडली. अभिषेकला आपले खातेही उघडता आले नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. १२ षटकांच्या आतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
विशेषतः उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शेडली वैन शालक्विकने भारतीय फलंदाजांना कमालीचे त्रस्त केले. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर, संजू सॅमसनच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशनलाही फारशी चमक दाखवता आली नाही; तो २० धावा करून माघारी परतला. टिळक वर्माने २५ धावांचे योगदान दिले, पण ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, ते शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांची बॅट मात्र शांत राहिली.
शेडली वैन शालक्विकने टाकलेल्या त्या एका षटकात इशान किशन, टिळक वर्मा आणि शिवम दुबे या तिन्ही भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशान २० धावांवर बाद झाला. हे षटक संपेपर्यंत टिळक वर्मा आणि शिवम दुबे हे देखील ड्रेसिंग रूममध्ये परतले होते.
या सामन्यात पॉवरप्ले संपला तेव्हा भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४६ धावा केल्या होत्या. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर घरच्या मैदानावरील टी-२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये भारताने केलेली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.






