भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच त्याने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली. वयाच्या १४ व्या वर्षात त्याची ही फलंदाजी पाहून लोकांना त्याचे कौतुक वाटत आहे. आता तो दहावीची परिक्षा देणार, अशा वृत्तांना वाचा फुटली. त्यासाठी त्याचे परिक्षेचे कार्डही बनून तयार आहे, मात्र तो ती देणार नाही. त्यामागचे कारण जाणून घेऊ.
बिहारच्या ताजपूरमध्ये राहणारा वैभव मोडेस्टी स्कूलमध्ये शिकतो. १७ फेब्रुवारीपासून त्याच्या दहावी बोर्डाच्या परिक्षा सुरू होत आहेत. त्याचे परिक्षा केंद्र समस्तीपूर शहराच्या पोद्दार आंतरराष्ट्रीय शाळा आहे. तो आता ही परिक्षा देणार नाही, यामागचे कारण त्याच्या काका आणि वडिलांनी सांगितले आहे.
वैभवचे वडिल संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या शाळेतील शिक्षकांसोबत चर्चा केली असता, तो यावर्षी परिक्षा देणार नाही हे स्पष्ट केले आहे. सततचा प्रवास आणि क्रिकेटमुळे वैभव घर आणि शाळेपासून दूर राहिला याचा त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. त्याला नीट परिक्षेची तयारीही करता आली नाही, असे कारण त्याच्या वडिलांनी दिले आहे.
वैभवने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने ३० षटकार मारले आहेत. तसेच तो लिस्ट ए मध्ये शतक मारणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. तसेच त्याने आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्येही शतके करत अनेक विक्रम मोडले आहेत. तो आयपीएलच्या इतिहासात शतकी खेळी करणारा युवा खेळाडू ठरला.
वैभवमध्ये चांगल्या फलंदाजाचे अपार कौशल्य असले तरीही तो सध्या भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळू शकत नाही. त्यामागचे कारण त्याचे वय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वय वर्ष १५ पूर्ण असणे आवश्यक केले आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एक खेळाडू केवळ एकाच विश्वचषकात खेळू शकतो, या धोरणामुळे तो भविष्यातील १९ वर्षाखालील विश्वचषकातही खेळू शकणार नाही.
वैभव मात्र आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.






