इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ मधील ज्या लढतीची सर्वांना प्रतिक्षा होती, ती आज (७ एप्रिल) खेळली जाणार आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि मुंबई इंडियन्सचा धोकादायक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच समोरा-समोर येणार आहेत. बुमराह, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. दुसरीकडे वैभवने लोकांची मने जिंकण्याचे काम फार कमी वयात सुरू केले. वयाच्या १५ व्या वर्षी इतकी प्रसिद्धी मिळवणारा वैभव, सचिन तेंडुलकर याच्यानंतर पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटनेही त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी इतकी प्रसिद्धी मिळवली नव्हती.
आयपीएल २०२६ चा हंगाम गाजवण्यासाठी वैभव सज्ज असून त्याने सुरूवातही धमाकेदार केली आहे. मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांसारख्या वेगवान अनुभवी गोलंदाज असलेल्या गुजरात टायटन्सला हरवत आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (सीएसके) वर्चस्व गाजवल्यानंतर वैभव बुमराहचा सामना करण्यास सज्ज आहे.
वैभवने या हंगामात सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. त्याने सीएसकेविरुद्ध १५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या. यावरून त्याला धमाकेदार सुरूवात करायला आवडते, तर बुमराहला मार खाण्याची सवय नाही. गेल्या हंगामात जेव्हा बुमराहला करुण नायरने ९ चेंडूत २६ धावा वसूल केल्या होत्या, तेव्हा तो चिढला होता. आता त्याच्याविरुद्ध वैभव कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वैभवने मागील हंगामात काही सामने खेळताना उत्तम कमगिरी केली होती. त्याने नुकतेच त्याचा वाढदिवस साजरा केला असून तो भारताच्या वरिष्ठ पुरूष संघासाठी पात्र ठरला आहे. विराट आणि रोहित २०२७ च्या वनडे विश्वचषकात खेळणार की नाही याबरोबरच वैभव भारतीय संघात कधी पदार्पण करणार ही चर्चाही सुरू असते. त्याने बुमराहविरुद्ध चांगली कामगिरी केली तर कदाचित त्याला भारतीय संघात लवकरात लवकर पदार्पण करण्याची संधी मिळेल.





