---Advertisement---

40 रिजेक्शन, आर्किटेक्ट जॉबनंतर पुन्हा क्रिकेट! आता आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 5:28 PM
---Advertisement---

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या चेंडूला जेवढे वळण नसेल तेवढे त्याच्या आयुष्यात दिसले. तो भारताच्या टी२० विश्वचषक २०२६ संघाचा भाग आहे. सध्या तो आयसीसीच्या टी२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. हे यश काही एका रात्रीत मिळाले नाही. यासाठी त्याने कसा संघर्ष केला ते पाहू.

वरूणने शाळेत असतानाच क्रिकेटपटू होण्याचे ठरविले होते. सुरूवातीला विकेटकीपरची भुमिका साकारणाऱ्या वरुणला ४० वेळा संघात निवडले गेले नाही. यामुळे त्याने निराश होत मागे फिरला, त्याने त्याचे क्रिकेट किटही मित्रांना देऊन टाकले. वरूणच्या जीवनातून क्रिकेट दूर गेले. त्याने शिक्षणाकडे लक्ष वळवले. त्याने एसआरएम विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली. त्याने तीन-चार वर्ष त्या क्षेत्रात जॉबही केला. सर्व नीट चालले असताना त्याला एका गोष्टीची कमी जाणवू लागली. क्रिकेट.

क्रिकेटवर वरुणचे असणारे अपार प्रेम त्याला पुन्हा एकदा क्रिकेटकडे ओढून घेऊन आले. शेवटी राहवले न गेल्याने त्याने मोठा निर्णय घेतला, आर्किटेक्चरपासून दूर जात पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याचा. वरुणची क्रिकेटची दुसरी इनिंग काही सोपी नव्हती. त्याने वेगवेगळ्या भुमिका निभावल्या, मग ती विकेटकीपरची, वेगवान गोलंदाजाची किंवा फलंदाजाची असे काही नीट होत नव्हते. तो पुन्हा एकदा सर्व सोडणार होता, तेव्हाच त्याने स्वत:मधील स्पीनर ओळखला.

आधी वरुणने वेगवान गोलंदाज होण्याचे प्रयत्न केला, नंतर त्याला गुडघ्याची दुखापत झाली. यामुळे त्याने स्पिनर होण्याचे ठरवले.

वरूणने २०१७-१८च्या हंगामात तमिळनाडूकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. त्याने जुबली क्रिकेट क्लबकडून वनडे स्पर्धा खेळताना ७ सामन्यात ३१ विकेट्स घेतल्या. त्याचे फिरकीचे कौशल्या फलंदाजांना चक्रावून सोडू लागले. नंतर त्याने तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (टीएनपीएल) त्याच्या कौशल्यावर आणखी काम केले. त्याने मदुराईला विजेतेपद जिंकून देण्यात महत्वाची भुमिका बजावली.

यामुळेच वरुणला आधी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सने नेट सेशनसाठी बोलावले. तेथे त्याने सुनील नरेन आणि इतरांची गोलंदाजी जवळून पाहिली आणि त्याच्या गोलंदाजीत बदल केले. तो २०१८ च्या टीएनपीएल ड्राफ्टमध्ये तो एक महत्त्वाचा खेळाडू ठरला, जिथे सीचेम मदुराई पँथर्स संघाने त्याला संघात घेतले. तेथे त्याने सर्वाधिक विकेट्स नाही घेतल्या, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट जबरदस्त होता.

वरुणने ४० षटके गोलंदाजी केली, त्यापैकी १२५ चेंडू निर्धाव होते. किमान १५ षटके गोलंदाजी केलेल्या गोलंदाजांमध्ये वरुणचा इकॉनॉमी रेट ४.७ असा सर्वोत्तम होता. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याने तमिळनाडूच्या विजय हजारे ट्रॉफी संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) प्रवेश केला.

२०१९मध्ये त्याला पंजाब किंग्जने ८.४ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले, मात्र त्याला दुखापतींनी घेरले. हा तोच वरूण आहे ज्याने चांगले पुनरागमन केले, यामुळे त्याने निराश न होता पुन्हा त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्याला २०२०मध्ये कोलकाता नाईट राडर्सने संधी दिली. त्याने १७ विकेट्स घेतल्या. त्यातील दिल्लीविरुद्ध ५ विकेट्स घेण्याची कामगिरीने त्याला भारतीय संघाचे दरवाजे उघडले. २०२१मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

वरुणने त्याच्या दुसऱ्याच वनडे सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५च्या हंगामात सहा सामन्यात १८ विकेट्स घेतल्या. २०२४च्या आयपीएलमध्ये २१ विकेट्स घेत केकेआरच्या आयपीएल विजेतेपदात मोठी भुमिका पार पाडली. तसेच तो भारताच्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा भाग राहिला आहे. यामध्ये त्याने ३ सामन्यात ९ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला.

वरुणने २०२५-२६च्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तमिळनाडूचे नेतृत्वही केले आहे. त्याच्या कारकिर्दीत प्रथमच त्याने कर्णधारपदाची भुमिका पार पाडली.

क्रिकेटच्या क्षेत्राबरोबर वरूणने अभिनयामध्येही आपला हात आजमावला आहे. त्याने २०१४मध्ये जीवा या तमिळ खेळाविषयीच्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट क्रिकेटपटूच्या संघर्षमयी जीवनावर आधारित आहे. तसेच तो कूकु विथ कोमाली या रिऍलिटी शोमध्येही दिसला होता.

अनेक वेळा संघात घेण्यास नकार, क्षेत्र बदलणे, दुखापती आणि नंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण करत उल्लेखनीय कामगिरी, वरूणचा हा प्रवास म्हणजे अपयशावर चांगलीच मात ठरला आहे.

दुखापतीमुळे फिरकीपटू बनलेला वरुण आता आगामी टी२० विश्वचषकात फलंदाजांना त्रस्त करण्यास तयार आहे. त्याने ३६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ५९ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---