भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. वडोदरा येथील कोटोंबी स्टेडियमवर तामिळनाडू आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात चक्रवर्तीनं 9 षटकांत 52 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा डाव 276 धावांवर आटोपला.
चक्रवर्तीनं शतकवीर अभिजीत तोमर (125 चेंडूत 111 धावा), कर्णधार महिपाल लोमरोर (49 चेंडूत 60 धावा) आणि दीपक हुडा (7 धावा) यांना बाद करत राजस्थानची मुख्य फळी उध्वस्त केली. यानंतर त्यानं अजय सिंग आणि खलिल अहमद यांना बाद करत आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या.
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी चक्रवर्तीच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी तो युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्यासोबत तिसरा फिरकीपटू म्हणून प्रमुख दावेदार ठरू शकतो. संघनिवडीत चक्रवर्तीचं नाव प्रामुख्याने चर्चेत येण्याची शक्यता आहे. येत्या 11 जानेवारीला भारतीय निवड समितीची बैठक होणार आहे. कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर असल्यानं चक्रवर्तीच्या निवडीची शक्याता अधिक आहे.
वरुण चक्रवर्तीनं ऑक्टोबर 2024 मध्ये तब्बल तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. 2024 मध्ये खेळलेल्या 7 टी20 सामन्यांत त्यानं प्रभावी कामगिरी केली. याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चक्रवर्तीच्या या कामगिरीनंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकतं.
वरुण चक्रवर्तीचा अनुभव पाहता तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्यानं भारतासाठी 13 टी20 सामन्यांमध्ये 19 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याच्या नावे आयपीएलच्या 70 सामन्यांमध्ये 83 विकेट्स आहेत. चक्रवर्ती 2021 टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचा सदस्य होता.
हेही वाचा –
सीएसकेच्या माजी खेळाडूचा मोठा पराक्रम! 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार
भारताच्या या वरिष्ठ खेळाडूची कारकीर्द धोक्यात! वनडे-कसोटी दोन्हीमधून बाहेर होण्याची शक्यता
फिरकीपटू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणार! रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव, कोणाला संधी मिळणार?