मुंबई। भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावक ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून मुंबई सेंट्रल कार्यालयात गौरव केला.
ऍलेक्स सिल्व्हेरा यांनी 1958 साली टोकियोमध्ये झालेल्या आशियाई खेळामंध्ये 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याआधी 1956 मध्ये त्यांनी विख्यात धावपटू मिल्खासिंग यांना एका शर्यतीत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र त्यांची 1956 आणि 1960 सालच्या मेलबर्न आणि रोम ऑलिम्पिकमध्ये देशासाठी खेळण्याची संधी थोडक्यात हुकली. 1960 साली ते पात्र देखील ठरले होते पण शेवटी त्यांचे विमान चुकले. सिल्व्हेरा (89) यांनी 1958 सालच्या कार्डिफमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. ती त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेवटची स्पर्धा ठरली.
सतिंदरपाल वालिया हे मूळचे पुण्याचे. हॉकी आणि फुटबॉल खेळणाऱ्या वालिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र त्यांना देखील ऑलिम्पिकचे स्वप्न साकार न झाल्याने पदरी निराशा पडली. 1968 मेक्सिको ऑलिम्पिक आणि 1970 बँकॉक आशियाई खेळांसाठी ते राखीव गोलरक्षक होते. मैदानावर आपल्याच एका खेळाडूबरोबर झालेल्या अपघातात त्यांचा हात मोडल्याने त्यांची खेळातील भूमिका बदलली. ते मग प्रशिक्षक आणि पंच बनले.
पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेच्या महिला हॉकी संघाची स्थापना आणि प्रगती यात वालियांचा मोलाचा वाटा होता. त्यांना आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ग्रेड वन दर्जा प्राप्त हायोता. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे अनेक वर्षे प्रशिक्षकपद सांभाळले.या काळात केरळ, हरयाणा, मणिपूर आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांतून प्रतिभेचा शोध घेत अनेक महिला खेळाडूंवर त्यांनी संस्कार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले. त्यांना महाराष्ट्र राज्याचा दादोजी कोंडदेव प्रशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ZIMvsIND: धवनला सचिन, धोनी, विराटला मागे टाकण्याची संधी! कॅप्टन राहुलच्या निशान्यावर ‘हे’ रेकॉर्ड्स
पूर्ण झाले कश्मीरी ऍथलीट दानिशचे ‘हे’ मोठे स्वप्न! मानले आभार
‘नाहीतर आम्ही क्रमवारीत वर कसं येणार?’ संतापलेल्या नॉर्कियाने थेट आयसीसीला विचारला सवाल