India vs England 2nd Test: एजबेस्टन कसोटी सामना आता पूर्णपणे भारतीय संघाच्या नियंत्रणात आहे. 608 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अडचणीत सापडला आहे. अवघ्या 72 धावांवर इंग्लंडने आपले 3 प्रमुख फलंदाज गमावले आहेत. झॅक क्रॉली, बेन डकेट आणि जो रूट हे तिघेही तंबूत परतले आहेत. कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला मालिकेत 2-0 आघाडी मिळवण्यासाठी अजून 536 धावा कराव्या लागणार आहेत. (Edgbaston Test Day 5)
त्याच वेळी इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी बीबीसीशी संवाद साधताना सांगितलं, “इंग्लंड आता हा सामना जिंकू शकणार नाही. भारतीय संघाने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर हा सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला आहे. मी इंग्लंडकडून काही वेगळं पाहू इच्छितो. जर मी मजेशीर भाषेत सांगायचं झालं तर, पाचव्या दिवशी ‘बेझबॉल’ पाहायला मिळणार नाही आणि कदाचित इंग्लंड विजयासाठी खेळणारही नाही. सामना ड्रॉ करणे हे देखील एका प्रकारचं यशच मानलं जातं. जर ते आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी गेले, जसं की ते नेहमी खेळतात, तर पूर्ण संघ ऑलआउट होईल. त्यांच्याकडे असा स्किल आणि मानसिकता आहे का की पूर्ण दिवस फलंदाजी करून सामना ड्रॉ करू शकतील? आपण थांबून पाहूया.” (Michael Vaughan on England)
बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त एक सामना ड्रॉ झाला आहे, तोही पावसामुळे. 21 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळाला असून, 12 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. माइकल वॉन म्हणतात की भारत आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या संघांविरुद्ध विजय मिळवण्यासाठी इंग्लंडने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलं, “जर तुम्हाला भारताविरुद्ध 5 सामन्यांची मालिका जिंकायची असेल किंवा ऑस्ट्रेलियात जाऊन विजय मिळवायचा असेल, तर केवळ विजयाच्या मानसिकतेसह ते शक्य नाही.” (Vaughan advice to England)






