शारजाह। इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात सोमवारी (१ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील सामना पार पडला. रोमांचक झालेल्या या सामन्यात इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडकडून जेसन रॉय आणि राखीव क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या सॅम बिलिंग्सने मिळून एक अद्भूत झेल घेतला, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६३ धावा केल्या. त्यानंतर, १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी बरी झाली नाही. श्रीलंकेने ५ विकेट्स ७६ धावांवर ११ षटकांच्या आतच गमावल्या होत्या. त्यामुळे, संघ अडचणीत सापडला होता.
पण, यानंतर कर्णधार दसून शनका आणि वनिंदू हसरंगा यांनी श्रीलंकेचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. हे दोघे फलंदाजी करत असताना श्रीलंकेच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. हे दोघे फलंदाजी करत असताना अखेरच्या चार षटकांत श्रीलंकेला ४१ धावांची गरज होती. यावेळी हसरंगा काहीसा आक्रमक खेळत होता. त्यामुळे श्रीलंकेला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्याचवेळी माशी शिंकली आणि १७ व्या षटकात हसरंगा झेलबाद झाला. रॉय आणि बिलिग्सने मिळून त्याचा झेल घेतला.
झाले असे की या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर हसरंगाने लाँग-ऑफला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू त्याच्या बॅटीच्या खालच्या बाजूला लागून हवेत उडाला. यावेळी जेसन रॉयने पळत येत सूर मारून सीमारेषेजवळ झेल घेतला, पण त्याचेवेळी तो सीमारेषेपलीकडे जाऊ शकतो हे लक्षात येताच त्याने दुसऱ्या बाजून पळत आलेल्या बिलिंग्सकेड फेकला. बिलिंग्सनेही कोणती चूक केली नाही आणि झेल घेतला. त्यामुळे हसरंगाला २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३४ धावा करुन बाद व्हावे लागले.
https://www.instagram.com/p/CVveNKjFPCM/
हसरंगा बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या खालच्या फळीने झटपट विकेट्स गमावल्या आणि श्रीलंका संघ १९ षटकांत १३७ धावांवर सर्वबाद झाला. शनकाने २६ धावा केल्या. शनका आणि हसरंगाने व्यतिरिक्त भानुका राजपक्षाने २६ धावांचे आणि चरिथ असलंकाने २१ धावांचे योगदान दिले. मात्र, कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. अखेर श्रीलंकेला पराभूत व्हावे लागले.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना आदील राशिद, ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच लिआम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, जोस बटलर आणि कर्णधार ओएन मॉर्गन यांच्या ११२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६३ धावसंख्या गाठली. बटलरने शतकी खेळी केली. त्याने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. तसेच मॉर्गनने त्याला चांगली साथ देताना ३६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दुश्मंता चमिराने १ विकेट घेतली.
इंग्लंडने हा विजय मिळवत टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा इंग्लंड पहिला संघ ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार
युनिव्हर्स जोस! झंझावाती शतकासह लावली विक्रमांची रांग
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे १० वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल