भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल केवळ वनडे आणि कसोटीत देशाचे प्रतिनिधीत्व करत असून तो राष्ट्रीय टी२० संघात नाही. यामुळे तो आगामी टी२० विश्वचषकाचाही भाग नसल्याने देशांतर्गत सामने खेळत आहे. सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात तो कर्नाटककडून खेळत आहे. यामध्ये त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम झेल घेतला आहे. त्याच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंजाबच्या दुसऱ्या डावातील ९४वे षटक टाकण्यास कर्नाटककडून विद्याधर पाटील आला. त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर आयुष गोयलला बाद केले. गोयलने शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावली. पाटीलने टाकलेल्या चेंडूने गोयलच्या बॅटची कड घेतली आणि तो थेट राहुलने उत्तमरित्या झेलला. त्याचा हा व्हिडिओ बीसीसीआय डोमेस्टिकने त्यांच्या ‘एक्स’च्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
हा सामना २९ जानेवारीपासून पंजाबच्या आयएस बिंद्रा पंजाब क्रिकेट असोसिएन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राहुलने कर्नाटकच्या पहिल्या डावात अर्धशतकही केले होते. त्याने ८७ चेंडूत ९ चौकारांच्या साहाय्याने ५९ धावा केल्या होत्या. त्याला पंजाबच्या हरप्रीत ब्रारने त्रिफळाचीत केले होते. दुसऱ्या डावात मात्र तो अपयशी ठरला. तो १३ धावा करत बाद झाला.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात ३०९ धावा केल्या. त्याच्या बदल्यात कर्नाटकने पहिल्या डावात ३१६ धावासंख्या उभारली. दुसऱ्या डावात पंजाबने २५६ धावा केल्याने कर्नाटकला विजयासाठी २५० धावांचे लक्ष्य मिळाले. यामध्ये देवदत्त पड्डीकलने नाबाद १२० धावा केल्या, ज्यामुळे कर्नाटकने हा सामना ५ विकेट्सने जिंकला.
या स्पर्धेत भारताचा वनडे- कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज इत्यादी खेळाडूही सहभागी आहेत. सिराजने तर हैद्राबादचे नेतृत्व केले आहे. त्यांचा छत्तीसगड विरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला.






