गुरुवारी (११ मार्च) विजय हजारे २०२१ स्पर्धेतील उपांत्यफेरीचे सामने खेळवण्यात आले. या फेरीत मुंबईचा सामना कर्नाटक विरुद्ध दिल्लीतील पालम ए स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात मुंबईने ७२ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार पृथ्वी शॉ ठरला. त्याने या सामन्यात आक्रमक दिडशतकी खेळी केली होती.
या सामन्यात मुंबईने कर्नाटकला ३२३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकला ४२.४ षटकात सर्वबाद २५० धावाच करता आल्या. कर्नाटककडून देवदत्त पडीक्कल आणि शरद बीआर यांनी अर्धशतके झळकावली. पडीक्कलने ६४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. तर शरदने ३९ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. त्यामुळे कर्नाटकला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबईकडून शम्स मुलानी, प्रशांत सोळंकी, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच धवल कुलकर्णी आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी मुंबईकडून सलामीवीर पृथ्वी शॉने १२२ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६५ धावांची ताबडतोड खेळी केली. त्याला शम्स मुलानीने ७१ चेंडूत ४५ धावांची खेळी करत तोलामोलाची साथ दिली. शॉ आणि मुलानीमध्ये १५९ धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी झाली. मुंबईकडून अन्य कोणाला फारशी मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे ४९.२ षटकात मुंबईचा डाव ३२२ धावांवर संपुष्टात आला.
कर्नाटककडून वैशाक विजय कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या. तसेच कृष्णप्पा गौतम, रोनीत मोरे आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १ विकेट घेतली.
आता अंतिम सामन्यात मुंबईसमोर उत्तर प्रदेश संघाचे आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशने गुजरातला पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.
उत्तर प्रदेशचा गुजरातवर विजय
उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशने गुजरातला ५ विकेट्सने पराभूत केले. गुजरातने उत्तर प्रदेशला १८५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान उत्तर प्रदेशने ४२.४ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. उत्तर प्रदेशकडून अक्षदीप नाथने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर गुजरातकडून चिंतन गजाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी गुजरातकडून हेत पटेलने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही खास करता आले नाही. त्यामुळे गुजरातने ४८.१ षटकात सर्वबाद १८४ धावाच करता आल्या. उत्तर प्रदेशकडून यश दयालने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ युवा भारतीय खेळाडूची गांगुलीने केली सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना