आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सिनेसृष्टी आणि क्रिकेट जगताचं एक जुनं नातं आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर चित्रपट बनले आहेत. ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरला तो चित्रपट म्हणजे, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ होय. याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरूद्दीन आणि अशा अनेक मोठ्या खेळाडूंवर बनलेल्या चित्रपटांचा आनंद आपण घेतला आहे.
यामध्ये आता आणखी एका बायोपिकचं नाव जोडले जाणार आहे. श्रीलंकेचा आणि क्रिकेट जगतातील महान फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. मुरलीधरनची भूमिका तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती साकारणार आहे.
चित्रपट व्यापार आणि विश्लेषक रमेश बाला आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही बातमी दिली. रमेश बाला यांनी लिहिले की, विजय सेतुपती आता मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच तरण आदर्शने ट्वीट करत म्हटले की, “अधिकृतरीत्या याची घोषणा झाली आहे की, विजय आता मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये अभिनय करताना दिसणार आहे.”
https://twitter.com/taran_adarsh/status/1314079963818020865
हा चित्रपट मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स प्रोड्यूस करणार आहे. ट्विटरवर मुथय्या मुरलीधरनचे नाव विजय सेतुपतीच्या नावासोबत ट्रेंडिंग होत आहे. क्रिकेट चाहते या बातमीने चांगलेच आनंदात दिसत आहेत.
https://twitter.com/rameshlaus/status/1314077488901885952
रमेश बाला आणि तरण आदर्शने ट्वीट करत चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. यामध्ये मुरलीधरनची ऍक्शन दाखवण्यात आली आहे. या बातमीच्या पुष्टीनंतर पुढील माहिती लवकरच सर्वांसमोर येणार आहे. विजय सेतुपतीचा चाहतावर्ग हा लाखांच्या घरात आहे. त्याला दक्षिण भारतातील सुपरस्टार म्हटले जाते, तर दुसरीकडे क्रिकेट जगतातील महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनही क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करतो. मुरलीधरनचे भारताशी नातेही खूप जुने आहे. त्याने चेन्नईच्या मधीमलार राममूर्तीसोबत २००५ साली लग्न केले होते.
मुथय्या मुरलीधरन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे.






