नागपूर। येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने आज घेतलेल्या हॅट्रिकच्या जोरावर मुंबईच्या फलंदाजीला १७३ धावतच रोखले. तसेच कर्नाटकने पहिल्या दिवसाखेर १ बाद ११५ धावा केल्या.
विनयने हॅट्रिक घेताना मुंबईच्या पृथ्वी शॉ, जय बिश्त आणि आकाश पारकर या महत्वाच्या वरच्या फळीतील फलंदाजांना बाद केले. आज कर्नाटकने सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विनयने पृथ्वीला २ धावांवर करूण नायर करवी झेलबाद केले. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या आणि सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडुवर बिश्त आणि आकाशचे बळी घेतले. बिश्तला सुद्धा विनयने नायर करवी झेलबाद केले. तर आकाशला पायचीत बाद केले.
या हॅट्रिक बरोबरच विनयने या सामन्यात एकूण ६ बळी मिळवले आणि कर्णधाराला साजेल अशी कामगिरी केली.
Three brilliant deliveries, three big wickets and Mumbai were straightaway on the backfoot owing to a @Vinay_Kumar_R special. WATCH the Karnataka captain's morning magic in @paytm #RanjiTrophy #QF4 #KARvMUM here – https://t.co/erPa0OOd0Y
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 7, 2017
कर्नाटकने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. कर्नाटकडून रवीकुमार समर्थ (४०), मयांक अग्रवाल(६२*) आणि मीर कौनायान अब्बास (१२*) यांनी धावा केल्या.
तत्पूर्वी मुंबईच्या फलंदाजांकडून आज सामन्यात पूर्णतः निराशा झाली. मुंबईकडून फक्त धवल कुलकर्णीने अर्धशतक केले. त्याच्या ७५ धावांच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने १७३ धावांचा टप्पा गाठला. अखिल हेरवाडकरने ३२ धावा करत थोडीफार लढत दिली. पण बाकीच्या एकही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.
कर्नाटककडून विनय बरोबरच अरविंद श्रीनाथने दोन, अभिमन्यू मिथुन आणि कृष्णप्पा गॉथमने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा
कर्नाटक पहिला डाव: १ बाद ११५ धावा
मयांक अग्रवाल(६२*) आणि मीर कौनायान अब्बास (१२*) खेळत आहेत.