भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला ठाणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या वैद्यकीय तपासणीत आढळलं की, त्यांच्या मेंदूत रक्त गोठलेलं आहे. सोमवारी, कांबळीच्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यानं मूत्राचा संसर्ग आणि क्रॅम्पची तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर ठाणे येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी म्हणाले की, तपासणीत कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या दिसून आल्या. आता मंगळवारी आणखी काही तपासणी केली जाईल. डॉ. त्रिवेदी यांनी असाही खुलासा केला की, रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. एस सिंग यांनी कांबळीवर विनामूल्य उपचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. विनोद कांबळीची प्रकृती सध्या ठीक असली तरीही परिस्थिती गंभीर आहे. अलीकडेच कांबळीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात त्याची तब्येत खूपच खराब असल्याचं दिसलं होतं.
गेल्या काही वर्षांत विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली आहे. 2013 मध्ये त्याच्यावर दोन वेळा हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत केली होती. या महिन्यात दिवंगत प्रशिक्षक रामकांत अचरेकर यांच्या स्मृती समारंभात विनोद कांबळीची ढासळलेली प्रकृती उघडकीस आली. समारंभात सचिन तेंडुलकर कांबळीला भेटायला आला तेव्हा त्याला खुर्चीवरुन उठणंही अवघड झालं होतं.
काही दिवसांपूर्वी कांबळीनं स्वतः तो मूत्रमार्गाच्या संसर्गानं ग्रस्त असल्याचं उघड केलं होतं. यानंतर कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंनीही त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कपिल देव यांनी कांबळी रिहाबसाठी तयार असल्यास त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.
हेही वाचा –
भारतीय संघातून हा महत्त्वाचा खेळाडू बाहेर होणार, नेमकं कारण जाणून घ्या
टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार
चाहत्यांचा हर्टब्रेक! मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं जारी केलं महत्त्वाचं अपडेट