नुकतेच रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानं हजेरी लावली होती. त्यावेळी कांबळीची प्रकृती पाहून सर्वांनाच धक्का बसला. सचिन तेंडुलकर जेव्हा त्याला भेटायला आला, तेव्हा कांबळीला नीट उभंही राहता येत नव्हतं. कांबळीची ही अवस्था पाहून 1983 च्या विश्वचषक संघातील खेळाडूंनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी कांबळीच्या रिहाबसाठी मदत देऊ केली, जी त्यानं स्वीकारली आहे. विनोद कांबळीनं नुकताच याचा खुलासा केला असून तो सचिनसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही बोलला.
कपिल देव म्हणाले होते की, ते विनोद कांबळीला पुन्हा त्याच्या पायावर उभं राहण्यास मदत करतील, मात्र यासाठी त्यानं रिहाबमध्ये जाणं आवश्यक आहे. कांबळीनं ही अट मान्य केली. त्यानं काही काळापूर्वी सांगितलं होतं की त्याच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत बीसीसीआय कडून मिळणारं पेन्शन आहे, जे दरमहा 30,000 रुपये आहे.
विनोद कांबळीनं नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल विचारण्यात आलं. यावर कांबळी म्हणाला की, त्याची परिस्थिती वाईट आहे. कांबळी म्हणाला, “माझ्या पत्नीनं ज्या प्रकारे सर्व काही हाताळलं, मी तिला सलाम करतो. मला रिहाबमध्ये जाण्यात कोणताही संकोच नाही. जोपर्यंत माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कशाचीही भीती नाही. मी नक्कीच परत येईन.”
विनोद कांबळीनं 2009 मध्ये सचिन तेंडुलकरबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. सचिननं मला पुरेशी मदत केली नाही, असं कांबळी म्हणाला होता. यानंतर दोघांमधील बोलणं थांबल्याचं सांगितलं जात होतं. परंतु या मुलाखतीदरम्यान कांबळीनं सांगितलं की, आता त्याचं सचिनसोबतचं नातं चांगलं आहे.
आपल्या जुन्या विधानाबाबत कांबळी म्हणाला की, तो तेव्हा खूप निराश होता. त्यामुळेच त्यानं असं वक्तव्य केलं. सचिनकडून त्याला हवी तशी मदत मिळाली नाही, असं त्याला वाटल्याचं कांबळी म्हणाला. कांबळीनं 2013 मध्ये सचिननं त्याच्या दोन शस्त्रक्रियांसाठी पैसे दिल्याचा खुलासाही केला आहे. “सचिन तेंडुलकरनं माझ्यासाठी खूप काही केलं. त्यानं 2013 मध्ये माझ्या शस्त्रक्रियेसाठी पैसे दिले होते”, असं कांबळीनं स्पष्ट केलं.
हेही वाचा –
IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी जय शहा अचानक ऑस्ट्रेलियात, मोठे कारण उघड
IND VS AUS; ब्रिस्बेन कसोटीत विराट कोहलीकडे हे तीन विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
27 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास, 1978 नंतर पहिल्यांदाच असा चमत्कार