कौशल्य हे व्यवस्थितरित्या हाताळले नाही तर, ते पुढे जाऊन काहीच कामी येत नाही. असाच काहीसा प्रकार भारतीय संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे बालपणीचे मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासोबत झाला होता.
शालेय स्तरावर सचिन तेंडुलकर सोबत विक्रमी भागीदारी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्यांना चांगली सुरुवात मिळाली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 7 कसोटी सामन्यात 2 दुहेरी शतक आणि 2 शतक झळकावले होते. तरीदेखील अवघ्या 2 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला. विनोद कांबळी बुधवारी (18 जानेवारी ) आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1972 मध्ये मुंबईच्या इंदिरा नगरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. (Vinod kambli birthday special)
विनोद कांबळी यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांचे वडील मॅकेनिक होते. त्यांच्यावर कुटुंबातील 7 सदस्यांची जबाबदारी होती. असे असतानाही विनोद कांबळी यांची क्रिकेटवरील निष्ठा कमी झाली नाही. त्यांनी क्रिकेटपटू होण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना साथ दिली कारण ते देखील एक क्रिकेटपटू होते. त्यांनी मुंबईच्या एका क्लबसाठी क्रिकेट खेळले होते.
त्यानंतर विनोद कांबळी यांची मैत्री सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत झाली. दोघांनी मिळून सरावाला सुरुवात केली आणि मुंबईच्या कांगा लीग स्पर्धेत दोघांनी एकत्र पदार्पण केले होते. शालेय क्रिकेट स्पर्धेत विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी मिळून विक्रमी भागीदारी केली होती. शारदाश्रम शाळेकडून खेळताना त्यांनी सेंट झेवियर्स शाळेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी 664 धावांची भागीदारी केली होती. यादरम्यान विनोद कांबळीने 349 धावांची खेळी केली होती.
तुफान फटकेबाजी केल्यानंतर विनोद कांबळीने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी देखील केली होती. सेंट झेवियर्सच्या पहिल्या डावातही त्याने 6 गडी बाद केले होते. या विक्रमी भागीदारीनंतर दोघांची नावे चर्चेत आली. यानंतर तेंडुलकरने 1988 मध्ये पदार्पण केले, तर कांबळीने एका वर्षानंतर 1989 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते.
सचिन तेंडुलकरला 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. तेव्हा तो अवघ्या 16 वर्षांचा होता. परंतु, विनोद कांबळीला पहिली कसोटी खेळण्यासाठी 1993 सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यांनी सुरुवातीच्या 7 कसोटी सामन्यात 2 शतक आणि 2 दुहेरी शतक झळकावले होते. त्यांनी शेन वॉर्नसारख्या दिग्गज गोलंदाजाविरुद्ध एकाच षटकात 22 धावा केल्या होत्या.
अवघ्या 2 वर्षात कारकिर्दीला लागला पूर्णविराम
विनोद कांबळी आपल्या बॅटच्या हँडेलला 9 ग्रीप लावायचे. त्यांच्या कारकिर्दीत सर्वच अस वेगाने घडत होतं. कदाचित त्यांना लवकर मिळालेली प्रसिद्धी टिकवून ठेवता आली नाही. त्यांच्या वाईट सवयी आणि वाईट वागणुकीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. वनडे संघात त्यांना 9 वेळेस पुनरागमन करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांची कसोटी कारकीर्द केवळ 2 वर्षच टिकू शकली. त्यांनी शेवटचा कसोटी सामना 1995 मध्ये खेळला.
ऑक्टोबर 2000 नंतर त्यांना भारतीय वनडे संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या चाहत्याने पाळला दिलेला शब्द! 74व्या शतकाच्या दिवशीच थाटला संसार, फोटो शेअर करत दिली माहिती
महिला विश्वचषकात पाकिस्तानच्या कर्णधाराचा अफलातून कॅच, व्हिडिओ पाहून पुरुष खेळाडूंच्याही बत्त्या होतील गुल