भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी टी२० विश्वचषकात तो भारताचे अखेरच्या वेळी नेतृत्व करेल. त्याच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. त्याचवेळी आता विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी देखील त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. तो भविष्यात आयपीएलमध्ये नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचे देखील नेतृत्व सोडून वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले.
विराट सोडू शकतो आरसीबीचे नेतृत्व
विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक असलेले राजकुमार शर्मा यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले,
“तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. केवळ आयसीसी ट्रॉफी न जिंकल्याने तुम्ही त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तो काही काळानंतर आरसीबीचे नेतृत्व देखील सोडण्याची शक्यता आहे.”
विराट गेली आठ वर्ष आरसीबीचा कर्णधार आहे. मात्र, त्याला एकदाही संघाला विजेतेपद मिळवून देता आले नाही. यावर्षी तो संघाला विजेते बनवण्याचा प्रयत्न करेल.
नवीन कर्णधार नवीन कल्पना आणेल
शर्मा यांनी विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले,
“नवीन कर्णधार नवीन रणनीती आणि नवीन कल्पना आणेल, त्यामुळे कोणाला कर्णधार बनवले जाते हे पाहणे मनोरंजक असेल. विराटला धोनीसारखीच भूमिका साकारायला आणि नवीन कर्णधाराला मदत करायला आवडेल. विराट आता अधिक इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाने टी२० विश्वचषकात खेळू शकतो. कारण, त्याला टी२० कर्णधारपद एका उच्च पातळीवर सोडायचे आहे. हा एक चांगला आणि योग्य निर्णय आहे. त्याने माझ्याशी ही चर्चा केली होती.”
शर्मा हे विराटचे पहिले प्रशिक्षक मानले जातात. आज ही विराट अनेकदा आपल्या खराब फॉर्म नंतर त्यांच्याशी सल्लामसलत करताना दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या-
कुंबळेंच्या नेतृत्वात विराटची बॅट ओकते आग, वाचा ही जबरदस्त आकडेवारी
‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश
अनिल कुंबळे पुन्हा बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक? ‘हा’ दिग्गजही शर्यतीत