भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे सुरू आहे. या सामन्यात शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या सामन्यात गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. विराट आणि रोहितची जोडी पुन्हा मैदानात उतरली आहे. तर श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजला देखील पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराटच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सामन्यात शतक तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने लागोपाठ शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं.
आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यासाठी मैदानात येताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराट हा भारतीय संघासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने सौरव गांगुली यांना मागे टाकलं आहे. हा विराटच्या वनडे कारकिर्दीतील 309 वा सामना आहे. तर सौरव गांगुली यांच्या नावे 308 सामने खेळण्याची नोंद होती.
विराटने वनडे क्रिकेटमध्ये खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. या सामन्यात जर त्याने शतक झळकावलं, तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 6 शतकं झळकावली आहेत.






