भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या भारतीय संघासह इंग्लंडमध्ये आहे. मँचेस्टर येथे होणारा वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळून तो विश्रांती घेणार आहे. कारण, वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या वनडे व टी२० मालिकेत तो सहभागी होणार नाही. भारतीय संघ ज्यावेळी वेस्ट इंडीजमध्ये खेळत असेल, तेव्हा विराट कुटुंबासह लंडनमध्येच वेळ घालवेल.
सध्या विराट खराब फॉर्ममधून जातोय. अनेक जण या कारणाने त्यावर टीका करत आहेत. विराटच्या भारतीय संघातील जागेवरही प्रश्नचिन्ह उभे केले जातेय. परंतु, भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराटला बाहेर करण्यासारखा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे म्हटले होते. तसेच तो लवकरच फॉर्ममध्ये येईल म्हणून त्याची पाठराखण केली होती.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, विराट कोहली भारतात परतणार नाही. तो आपल्या कुटुंबासह लंडनमध्येच जवळपास महिनाभर वास्तव्य करेल. त्याची पत्नी अनुष्का व मुलगी वामिका या आधीपासूनच लंडनमध्ये आहेत. भारतातून त्याची आई लवकरच तिकडे रवाना होईल. त्यानंतर हे कुटुंब तेथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसेल. काही दिवसांपूर्वी विराट पत्नी अनुष्कासह लंडनमधील एका भजनाच्या कार्यक्रमाला गेल्याची छायाचित्रे व्हायरल झाली होती.
अनेकांनी केली टीका
विराट कोहलीने विश्रांती घेतल्यामुळे काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. विराट विश्रांती घेण्यापेक्षा मैदानावर उतरला तर त्याचा फॉर्म लवकर येऊ शकतो, असे काही दिग्गजांनी म्हटले आहे. तर काहींनी देशासाठी खेळताना विश्रांती घेण्यापेक्षा आयपीएलमध्ये विश्रांती घेतली असती तर चालले नसते का? असा सवाल ही केला आहे. २२ जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये वनडे व टी२० मालिका खेळेल. या दोन्ही मालिकांमध्ये विराट संघाचा भाग असणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित
आयपीएल २०२२साठी मुंबईने रिटेन केले नाही हे ऐकून त्याला धक्का बसला होता- रवी शास्त्री
अश्विनच्या ‘स्विच हीट’ विधानावर न्यूझीलंडच्या दिग्गजाचे धक्कादायक वक्यव्य; म्हणाला, ‘बॅन करा….’