संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ८ गड्यांनी पराभूत केले. या पराभवानंतर बोलताना भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर व समालोचक सुनील गावसकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गावसकर?
रविवारी भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माविषयी बोलताना ते म्हणाले,
“रोहितला ज्याप्रकारे या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवले गेले, त्यावरून स्पष्टपणे असे जाणवत होते की, संघ व्यवस्थापनाला व कर्णधार विराट कोहलीला ट्रेंट बोल्टसमोर त्याच्यावर विश्वास नाही. बऱ्याच काळापासून एकाच जागेवर खेळत असलेल्या खेळाडूला अशा निर्णयामुळे स्वतःच्या क्षमतेवर शंका निर्माण होते.”
नियमितपणे भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या रोहितला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवले गेले होते. तो यामध्ये केवळ १४ धावा काढून माघारी परतला.
ईशान हिट अँड मिस खेळाडू
या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळालेल्या युवा ईशान किशनविषयी गावसकर म्हणाले,
“ईशान एक हिट अँड मिस खेळाडू आहे. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उत्तम खेळ दाखवू शकतो. परिस्थितीनुरूप तो फटकेबाजी करण्यास सक्षम आहे. त्याने चांगली खेळी केली असती तर त्याचे कौतुक झाले असते. मात्र, तो अपयशी ठरला.”
प्रथमच विश्वचषकात खेळत असलेल्या ईशानला या सामन्यात ८ चेंडूवर केवळ चार धावा करता आल्या.
भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव
विश्वचषक मोहिमेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून तब्बल १० गड्यांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुबई येथे रविवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ गड्यांनी लोळवले. या पराभवामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत. भारताला उर्वरित तीनही सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच, इतर सामन्यांच्या निकालावरही भारतीय संघाचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्याने अचानक घेतली निवृत्ती, असगर अफगानचा धक्कादायक खुलासा
केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय