मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने एका विक्रमाला गवसणी घातली.
विराटने या सामन्यात नाबाद २० धावांची खेळी करत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात २००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला.
भारतीय डावच्या १६ व्या षटकात विराटने वैयक्तीक आठवी धाव घेत टी-२० कारकिर्दीत २००० धावा पूर्ण केल्या.
विराटला टी-२० मध्ये दोन हजार धावा पूर्ण करायला ६० सामने लागले.
तसेच भारताकडूनही टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला.
या सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्माला सुद्धा आपल्या टी-२० कारकिर्दित २००० धावांचा टप्पा गाठण्याची संधी होती.
या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नावावर ८१ सामन्यात १९४९ धावा होत्या. त्याला या सामन्यात टी-२० कारकिर्दित २००० धावा करण्यासाठी ५१ धावांची गरज होती. मात्र रोहीत शर्मा ३२ धावांवर बाद झाल्याने त्याला हा प्रराक्रम करण्यासाठी पुढच्या सामन्याची वाट पहावी लागणार आहे.
आता रोहित शर्माच्या नावावर ८२ टी-२० सामन्यात १९८१ धावा आहेत.
यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये मार्टीन गुप्टील, ब्रेंडन मॅक्कुलम आणि शोएब मलिकने २००० धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये आता विराट कोहलीनेसुद्धा स्थान मिळवले आहे.
मंगळवार, ३ जुलैच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने…
-अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम