भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून जात आहे. कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. तो खेळपट्टीवर एका-एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली फॉर्ममध्ये परत येईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. विराटनं यापूर्वी ऑस्ट्रेलियात भरपूर धावा ठोकल्या आहेत. मात्र बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यानं पुन्हा एकदा निराश केलं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिली कसोटी पर्थमधील ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर खेळली जात आहे. या कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थित भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्यण घेतला. मात्र आतापर्यंत हा निर्णय चुकीचा ठरत असल्याचं दिसतंय.
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली पुन्हा एकदा लवकर बाद झाला. विराट 5 धावा करून जोश हेजलवूडचा बळी ठरला. उस्मान ख्वाजानं स्लिपमध्ये त्याचा झेल घेतला. वास्तविक, हेजलवूडनं एक शॉर्ट लेन्थ चेंडू टाकला होता. हा चेंडू थेट विराटच्या शरीरावर आला. चेंडूच्या उंचीमुळे विराट त्याचा योग्यपणे बचाव करू शकला नाही. चेंडूनं विराटच्या बॅटचा कड चाटला आणि स्लिपमध्ये ख्वाजानं त्याचा अचूक झेल घेतला.
पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागला. 40 षटकांत भारतीय संघानं 6 गडी गमावून 105 धावा केल्या आहेत. विराट कोहलीशिवाय भारताचे अन्य फलंदाजही सपशेल फ्लॉप ठरले. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाले. केएल राहुल चांगल्या लयीत दिसत होता. मात्र तो देखील 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला. सध्या रिषभ पंत आणि नितिश कुमार रेड्डी क्रिजवर आहेत.
हेही वाचा –
IND VS AUS; थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ! केएल राहुल बाद की नाबाद? तुम्हीच सांगा, पाहा VIDEO
ठरलं..! आयपीएल 2025 या दिवशी सुरू होणार, पुढील तीन वर्षांचे वेळापत्रक समोर
अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं