ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय संघाला बॉर्डर- गावसकर ट्रॉफी जिंकून देणाऱ्या प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. येत्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला हटवण्यात यावे. अन् रहाणेच्याच हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. परंतु ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग हे या गोष्टीशी सहमत नसल्याचे दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू हॉग यांनी कोहली कर्णधाराच्या भूमिकेत असताना अधिक खुलून फलंदाजी करतो. जर त्याला नेतृत्त्वपदावरुन हटवण्यात आले; तर संघाची परंपरा बिघडेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉग म्हणाले की, “विराट जेव्हा संघाचा कर्णधार असतो तेव्हा तो उत्कृष्ट फलंदाजी करतो. सोबतच पुढे येऊन संघाचे नेतृत्त्वही करतो. रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शानदार कामगिरी केली आहे. तो शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. तो कोणत्याही गोष्टीवर जास्त उत्तेजित होत नाही. परंतु जर तुम्ही संघाचा कर्णधारच बदलाल; तर संघाची परंपरा धुळीस मिळेल.”
विराट पालकत्व रजेवर असल्याने रहाणेला नेतृत्वाची संधी
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. त्यामुळे या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
अजिंक्य रहाणेचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील यश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर विराटने पालकत्व रजा घेतल्याने उर्वरित सामन्यांत रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटीत विजय मिळवले, तसेच सिडनी येथे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.
इंग्लंड संघ लवकर भारताच्या दौऱ्यावर
पुढील महिन्यात इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात ५ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. त्यानंतर १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत दोन्ही संघ ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. सर्व टी२० क्रिकेट सामने अहमदाबाद येथे खेळले जातील. तर २३ मार्च ते २८ मार्च दरम्यान पुणे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ‘ही’ महागडी भेट
पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण