शनिवारी (१९ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पावसामुळे शुक्रवारी सुरु होणारा हा सामना शनिवारी सुरु झाला. दरम्यान, या सामन्यासाठी मैदानात उतरताच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे.
विराट हा आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. आयसीसी तर्फे १४४ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून खेळण्याचा मान विराटला मिळाला आहे.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आयसीसीकडून वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धांचे आयोजनही केले जात असते. विराटने या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यात किमान एकदा तरी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
यापूर्वी विराट आयसीसीतर्फे आयोजित २०११ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. तसेच त्याने २०१३ आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्य़े विराटने भारताचे नेतृत्वही केले होते. त्याचबरोबर विराट २०१४ साली टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून खेळला आहे. आता विराट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही खेळत आहे.
विराटची शानदार फलंदाजी
शनिवारी कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराटकडून शानदार फलंदाजीचे प्रदर्शन झाले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात सुरुवातीच्या ३ विकेट्स ८८ धावांच्या आत गमावलेल्या असताना एका बाजून चांगली फलंदाजी केली.
त्याने स्विंग गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, काईल जेमिसन, नील वॅग्नर अशा चांगल्या वेगवान गोलंदाजांसमोर तग धरत शनिवारचा खेळ संपला तेव्हा १२४ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेची चांगली साथ मिळाली. त्यामुळे भारतीय संघाला शनिवारी दिवसाखेर ३ बाद १४६ धावा करता आल्या.
विराटने धोनीला टाकले मागे
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने या विक्रमाच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने कसोटीमध्ये ६० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल
कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिला आशियाई कर्णधार