अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम केला आहे.
तो शनिवारी(8 डिसेंबर) भारताच्या दुसऱ्या डावात 34 धावांवर बाद झाला, तेव्हा त्याने 2018 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे तो सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने आत्तापर्यंत 2018 या वर्षात वनडेत 1202 धावा , टी20 मध्ये 211 धावा आणि कसोटीत 1100 धावा असे मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 35 सामन्यात 69.80 च्या सरासरीने 2513 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने 2016 या वर्षातही 37 सामन्यात 86.50 च्या सरासरीने 2595 धावा केल्या होत्या, तर 2017 या वर्षांत त्याने 46 सामन्यात 68.73 च्या सरासरीने 2818 धावा केल्या होत्या.
याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला होता. सचिनने 1996, 1997 आणि 1998 या सलग तीन वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला होता.
विराट हा 2016, 2017 आणि 2018 या तीनही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे आॅस्ट्रेलियन संघाने आज हाताला बांधली काळी पट्टी
–हा आॅस्ट्रेलियन गोलंदाज पडतोय भारतीय फलंदाजांना भारी
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश