यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाबवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यंदाच्या हंगामात विराट कोहली उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने शानदार अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीच्या मदतीने किंग कोहलीने एक मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. खरं तर, कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला आहे.
पंजाब किंग्जने आरसीबीसमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पाहुण्या संघाने 19व्या षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले. हे लक्ष्य साध्य करण्यात उजव्या हाताच्या अनुभवी फलंदाज कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 73 धावा केल्या.
आयपीएलमध्ये कोहलीची ही 67वी 50 पेक्षा जास्त धावसंख्या होती. याआधी आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा रेकाॅर्ड डेव्हिड वाॅर्नरच्या नावावर होता. वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 66 वेळा हा पराक्रम केला आहे. आता कोहलीने त्याला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 53 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारे टॉप 5 फलंदाज
विराट कोहली – 67
डेव्हिड वॉर्नर – 66
शिखर धवन – 53
रोहित शर्मा – 45
केएल राहुल – 43
हे उल्लेखनीय आहे की विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. आतापर्यंत त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 260 सामने खेळले आहेत आणि 39.27च्या सरासरीने 8,326 धावा केल्या आहेत. या काळात कोहलीने 8 शतकांसह 59 अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.