भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज सुरु झाला. परंतु नाणेफेकीला गेलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक हरण्याचा विक्रम केला आहे.
विराट कोहलीने सलग पाचव्या सामन्यात नाणेफेकीवेळी ‘हेड’ असं म्हटलं. परंतु सलग पाचव्यांदा नाणेफेक झाल्यावर नाणं हे ‘टेल्स’ ह्या बाजूने पडलं.
यापूर्वी भारतीय कर्णधार ४ किंवा त्यापेक्षा जास्त एकदिवसीय सामने असणाऱ्या मालिकेत सर्वच नाणेफेक इंग्लंडमध्ये २०११ साली एकदिवसीय मालिकेत हरला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार एमएस धोनी हा ती मालिका ०-३ अशा फरकाने हरला होता. महान फलंदाज आणि भारताचे कर्णधार सुनील गावसकर १९८४ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्व नाणेफेक हरले होते तर सौरव गांगुली २००४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्व नाणेफेक हरला होता.
तर विंडीज यापूर्वी सगळ्या नाणेफेक १९९३ साली हिरो कपमध्ये जिंकला होता. त्यावेळी रिची रिचर्डसन हा विंडीजचा कर्णधार होता. जेसन होल्डर हा केवळ दुसरा विंडीजचा कर्णधार आहे ज्याने मालिकेतील सर्व नाणेफेकी जिंकल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यात ५ पैकी ५ नाणेफेक हरणारे भारतीय कर्णधार
१९८४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सुनील गावसकर
२००४ विरुद्ध पाकिस्तान, सौरव गांगुली
२०११ विरुद्ध इंग्लंड, एम एस धोनी
२०१७ विरुद्ध विंडीज विराट कोहली