चेजमास्टर म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली एकेकाळी भारताच्या विजयाची गॅरंटी होता. तो क्रिजवर असला म्हणजे टीम इंडियाचा विजय पक्का, हे जणू समीकरणच बनलं होतं. मात्र गेल्या काही काळापासून कोहलीच्या या प्रतिमेला तडा गेला आहे.
विराट कोहली मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात देखील फ्लॉप झाला. त्यानं पहिल्या डावात बराच संयम दाखवला होता. मात्र दुसऱ्या डावात तो पुन्हा एकदा ऑफ स्टंप बाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद झाला. कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 340 धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना कोहली 29 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला.
एक फलंदाज म्हणून विराट कोहलीसाठी 2024 हे वर्ष एखाद्या भयानक स्वप्नासारखं राहिलं. या वर्षातील त्याची आकडेवारी पाहिली, तर हा तोच फलंदाज आहे, ज्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 81 शतकं आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही! विराट कोहलीची या वर्षातील धावांची सरासरी अवघी 21.83 एवढी राहिली. कसोटीत त्यानं 24.52, वनडेत 19.33 आणि टी20 मध्ये केवळ 18 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. कोहलीच्या स्तराच्या फलंदाजासांठी ही आकडेवारी निश्चितच लाजीरवाणी आहे.
आणखी एक आकडा आहे, ज्याद्वारे तुमच्या लक्षात येईल की विराट कोहलीसाठी 2024 हे वर्ष किती खराब राहिलं. एका वर्षात अव्वल 7 फलंदाजांच्या सर्वात कमी सरासरीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. ही अशा फलंदाजांची लिस्ट आहे, ज्यांनी त्या वर्षात कमीत कमी 30 डाव फलंदाजी केली. या लिस्टमध्ये नयन मोंगिया अव्वल स्थानी आहे, ज्याची 1996 मध्ये सरासरी 21.20 एवढी होती. दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीची 2024 मध्ये सरासरी 21.83 एवढी राहिली.
एका वर्षात भारताच्या अव्वल 7 फलंदाजांची सर्वात कमी सरासरी (कमीत कमी 30 डाव)
21.20 – नयन मोंगिया (1996)
21.83 – विराट कोहली (2024)
24.25 – रॉबिन सिंग (1999)
25.68 – केएल राहुल (2022)
25.90 – वीरेंद्र सेहवाग (2012)
26.22 – रोहित शर्मा (2022)
26.90 – केएल राहुल (2018)
हेही वाचा –
मेलबर्न कसोटीत फक्त बुमराहचीच हवा! या कामगिरीसह दिग्गजांच्या लिस्टमध्ये एंट्री
“भाऊ, तु आता निवृत्ती घे”; रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुरुवात
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण