भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला हवेत जबरदस्त फटके मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. याच कारणामुळे त्याला ‘हिटमॅन’ असे नाव देण्यात आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात अहमदाबाद येथे शनिवारी (२० मार्च) पाचवा आणि निर्णायक टी२० सामना झाला. या सामन्यातही रोहितने एकाहून एक जबरदस्त षटकार-चौकार मारले. दरम्यान त्याचा एक अनोखा शॉट पाहून कर्णधार विराट कोहली अवाक् झाला. यावेळी त्याने दिलेल्या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, या सामन्यात फलंदाजी क्रमवारीत बदल करत विराट रोहितसोबत सलामीला फलंदाजीसाठी उतरला. त्यांनी मिळून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. यावेळी दोघेही एकमेकांच्या फलंदाजीचा भरघोस आनंद लुटताना दिसले. त्यातही रोहितने इंग्लंडचा गोलंदाज सॅम करनच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फ्लिक शॉट मारत कमालीचा षटकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केले.
रोहितच्या या अनोख्या शॉटला पाहून नॉन स्ट्राईकवर उभा असलेला विराट दंग झाला. त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही की रोहित इतका शानदार फ्लिक शॉट खेळू शकतो. परंतु खरोखरच रोहितने फ्लिक शॉट खेळत चेंडू सीमारेषेपार पाठवल्याचे पाहून विराटचा आनंद अनावर झाला. त्याने आपली मान हलवत आणि येस म्हणत आपला आनंद व्यक्त केला. विराटची यावेळची रिऍक्शन चाहत्यांना फार आवडली आहे.
https://twitter.com/Vijaypbvk/status/1373273370943365123?s=20
मात्र पुढे दुर्भाग्याने बेन स्टोक्सच्या षटकात रोहित त्रिफळाचित झाला. पहिल्या पाच चेंडूवर एक षटकार आणि चौकार मारल्यानंतर अखेरच्या चेंडूवर स्टोक्सने त्याची दांडी उडवली. यासह ३४ चेंडूत ६४ धावा करत रोहितच्या दमदार खेळीला पूर्णविराम लागला.
मात्र विराटने डावाखेर मैदानावर टिकून इंग्लंडला २२५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत इंग्लंडला १८८ धावांवर रोखले. अशाप्रकारे ३६ धावांनी निर्णायक सामना जिंकत भारताने ३-२ ने टी२० मालिका खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची ‘विजयी सलामी’; आता आयपीएल २०२१ मध्येही करणार ‘ओपनिंग’
Video: निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन, शुभेच्छा देत थोपटली पाठ