भारत आणि हॉंगकॉंग यांच्यातील सामना बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला. भारतीय संघाने 40 धावांनी विजय मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपले 31 वे टी20 अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह विराटने भारताचा माजी दिग्गज फलंदाज व विद्यमान संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची बरोबरी करत संयुक्तरीत्या दुसरे स्थान पटकावले.
भारताच्या पहिल्या गड्याच्या रूपात रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने या सामन्यात 44 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. विराटचे शेवटचे अर्धशतक तब्बल 194 दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध आले होते.
विराटने आपल्या या अर्धशतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले. आता विराटच्या नावे 193 आंतरराष्ट्रीय अर्धशतके आहेत. राहुल द्रविड यांनीदेखील आपल्या कारकिर्दीत इतकीच अर्धशतके झळकावली आहेत. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याही यादीत अव्वलस्थानी असून, त्याच्या नावे तब्बल 264 अर्धशतके आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आपल्या कारकिर्दीत 144 तर, विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्माने 127 अर्धशतके ठोकले आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये 192 धावा उभारल्या. विराटसह सूर्यकुमार यादव यानेदेखील तुफानी नाबाद अर्धशतक साजरे केले. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत अ गटात आघाडी घेतली असून, हॉंगकॉंगविरूद्ध विजय मिळवत सुपर फोर मधील आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अल्टीमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमसाठी एकूण 2कोटी पारितोषिक रक्कम जाहीर; प्ले ऑफ सामन्यांना शुक्रवारी प्रारंभ
धवनसाठी मुलगी शोधा! नवीन व्हिडिओ व्हायरल, भारताचा सलामीवीर करणार का दुसरे लग्न?
‘भारताचा सामना पाहण्यासाठी येऊ नकोस’, BAN vs AFG सामन्यात दिसलेल्या सुंदरीची सुरुये सर्वत्र चर्चा