आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या विराट कोहलीने शुक्रवारी (२२ मे) आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला. आयपीएल २०२६ मध्ये ६७ वा सामना राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा खेळला गेला. यामध्ये विराटने छोटी खेळी केली असली तरी एक विश्वविक्रम केला आहे.
विराट पुरुष टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱ्यांमध्ये सहभागी असणारा फलंदाज विराट ठरला आहे. त्याने एसआरएच विरुद्ध व्यंकटेश अय्यरसोबत २७ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. या सामन्यांत २५६ धावांचे लक्ष्य गाठताना विराट-व्यंकटेशने केवळ ३.४ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या.
पुरुष टी२० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी सहभागी होण्याची विराटची ही २११ वी वेळ आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या ॲलेक्स हेल्सच्या नावावर होता. त्याने २१० वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या (२००), पाकिस्तानचा बाबर आझम (१९६) चौथ्या आणि वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (१९१) पाचव्या स्थानी आहे.
टी २० मध्ये सर्वाधिक ५०+ पार्टनरशीपचा भाग असणारे खेळाडू (पुरुष)
२११ – विराट कोहली*
२१० – ॲलेक्स हेल्स
२०० – डेव्हिड वॉर्नर
१९६ – बाबर आझम
१९१ – क्रिस गेल
हा सामना एसआरएचने ५५ धावांनी जिंकला, मात्र गुणतालिकेत आरसीबीच पहिल्या स्थानी कायम आहेत. एसआरएचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी पुन्हा एकदा संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. हेड १६ चेंडूंत २६ धावा करत बाद झाला. अभिषेकने २२ चेंडूंत ५६ धावा केल्या. त्यानंतर ईशान किशन आणि हेनरिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११३ (४८) धावांची भागीदारी केली, जी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. ईशानने ७९ धावा आणि क्लासेनने ५१ धावा केल्या आणि एसआरएचने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २५५ धावसंख्या उभारली. आरसीबीकडून रसिक सलाम दारने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स दिल्या.






