आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियन मीडियात आलेल्या एका रिपोर्टमध्ये स्टार फलंदाज विराट कोहलीला दुखापत झाल्याचा दावा करण्यात आलाय.
विराट कोहलीच्या दुखापतीची बातमी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. मालिका सुरू होण्यासाठी अवघा एक आठवडाही शिल्लक नाही. त्यामुळे विराटच्या दुखापतीमुळे टीम इंडियावर मानसिक दडपणही येऊ शकतं. मात्र दुखापतीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळली जाईल.
एका ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला गुरुवारी काही स्कॅन करावे लागले, परंतु याचं कारण समोर आलेलं नाही. चांगली बातमी अशी आहे की कोहलीचं कोणतंही स्कॅन झालं असलं तरीही तो शुक्रवारी सिम्युलेशन मॅचमध्ये खेळताना दिसला. या सिम्युलेशन मॅचमध्ये त्यानं 15 धावा केल्या. मात्र यादरम्यान केएल राहुलमुळे टीम इंडियाचा तणाव वाढला आहे. फलंदाजी करताना राहुलच्या कोपरावर चेंडू आदळला, ज्यामुळे त्याला दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडावं लागलं.
भारतीय संघ बुधवारपासून वाका स्टेडियमवर सराव करत आहे. कोहलीवर नजर टाकली तर त्याचा खराब फॉर्म चर्चेत आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगचं वक्तव्य व्हायरल झालं होतं, ज्यात त्यानं म्हटलं होतं की गेल्या 5 वर्षात केवळ 2 कसोटी शतकं ही विराट आणि टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. विराटचं शेवटचं कसोटी शतक जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आलं होतं. कोहलीवर ही टीका होत आहे, कारण न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या 6 डावात तो केवळ 93 धावा करू शकला होता.
बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत विराट कोहलीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या मागचं कारण असं की, भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. भारताला कोणत्याही संघावर अवलंबून न राहता अंतिम फेरीत जायचं असेल तर पाच सामन्यांच्या मालिकेत किमान चार विजय नोंदवावे लागतील. विराट कोहलीनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 42 डावांमध्ये 1,979 धावा केल्या आहेत. या मालिकेच्या इतिहासात त्याच्या नावावर 8 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत.
हेही वाचा –
पहिल्या कसोटीपूर्वी भारताचे दिग्गज फलंदाज फ्लॉप! नवख्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली
रिषभ पंतचा बाउन्सर, जसप्रीत बुमराहचा षटकार? सरावादरम्यानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
चौथ्या टी20 मध्ये संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या