भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. वनडे मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टी२० मालिकेतही भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. मालिकेतील तिसरा व अखेरचा २० फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी(१९ फेब्रुवारी) सकाळी तो संघापासून वेगळा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
म्हणून विराट गेला घरी
भारतीय संघाने शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आठ धावांनी विजय मिळवला. या विजयात विराट कोहली याचे मोलाचे योगदान राहिले. विराटने अत्यंत शानदार अशी ५२ धावांची खेळी केली. अनेक दिवसानंतर चाहत्यांना त्याची ही खेळी पाहायला मिळाली.
भारतीय संघाने मालिका विजय साजरा केला असल्याने विराटने घरी परतण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,
“विराट शनिवारी सकाळी आपल्या घरी परतला आहे. जे खेळाडू तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहेत त्यांना आम्ही थोडी थोडी विश्रांती देवू. खेळाडूंवर बायो-बबलचा परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंट व खेळाडूंच्या आरोग्याचा बीसीसीआय सर्वप्रथम विचार करते.”
याचबरोबर विराट श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेतही खेळताना दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र, कसोटी मालिकेत तो सहभागी होईल. बेंगलोर येथे होणारा मालिकेतील पहिला कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल.
सातत्याने खेळत आहे विराट
विराट कोहली सातत्याने भारतीय संघासह आहे. आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध, टी२० विश्वचषक, दक्षिण आफ्रिका दौरा व आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका या सर्वांमध्ये तो सामील झाला आहे. भारतीय संघाला यावर्षी पुन्हा एकदा टी२० विश्वचषक खेळायचा असल्याने विराट तंदुरुस्त राहणे भारतीय संघाच्या फायद्याचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
पॉवेल फटकेबाजी करताना खूश होत होता पंत! वाचा संपूर्ण प्रकरण (mahasports.in)
विजयानंतरही कर्णधार रोहितने टोचले टीम इंडियाचे कान; म्हणाला… (mahasports.in)