बीसीसीआयने मागील काही महिन्यापासून खेळाडूंसाठी यो-यो टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेआधी किंवा दौऱ्याआधी खेळाडूंना ही यो-यो टेस्ट देणे आवश्यक आहे.
यामुळे इंग्लंड तसेच आयरलँड दौऱ्याला समोर ठेऊन शुक्रवारी खेळाडूंच्या यो-यो टेस्टचे बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)मध्ये आयोजन करण्यात आले होते. या टेस्टसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीही हजर होते.
या दोन दिग्गज खेळाडूंसोबत सुरेश रैना तसेच भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, युजवेंद्र चहल, केदार जाधव, वॉशिंग्टन सुंदर आणि सिद्धार्थ कौल हे ही टेस्ट देण्यासाठी उपस्थित होते.
आयपीएल दरम्यान विराटला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने प्रस्तावित कौंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळण्याचा निर्णय रद्द केला होता. भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बासू यांच्या निगराणीखाली विराट तंदुरूस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे.
याआधीही 8 जूनला इग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय अ संघातील खेळाडूंची तर 9 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची यो-यो टेस्ट झाली आहे.
यात मोहम्मद शमी यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली.
त्याच्या जाग्यावर नवदीप सैनीची निवड करण्यात आली होती. संजू सॅमसनला ही यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याने भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली.
सध्याच्या नियमांप्रमाणे यो-यो टेस्ट पास होण्यासाठी खेळाडूंना 16.1 गुण मिळवावे लागतात. पण पुढील काही दौरे आणि 2019चा विश्वचषक लक्षात घेता रवी शास्त्रींनी पास होण्याचे गुण 16.1 वरून 16.3 करावे असा प्रस्ताव संघव्यवस्थापणासमोर मांडला आहे.
पुढील आठवड्यात भारतीय संघ आयरलँड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याला 27 जूनपासून सुरवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आयरलँड विरुद्ध 2 टी 20 सामने खेळेल. त्यानंतर ते इंग्लंड दौऱ्यावर रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या:
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–टाॅप ५- फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषकातील हे आहेत ५ मोठे फरक
–तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात