नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी असणाऱ्या पेप्सीची जाहिरात करण्यास यापुढे नकार दिला आहे. भारताचा हा स्टार खेळाडू गेल्या सहा वर्षांपासून पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करत होता.
कोणत्याही खेळाडूने एखाद्या कंपनीशी करणार केल्यानंतर जेव्हा तो करार संपतो तेव्हा तो वाढवायचा किंवा नाही याबद्दल खेळाडूची त्यावेळीही लोकप्रियता ध्यानात घेतली जाते. त्यामुळेच याबद्दल विराटकडे विचारणा झाली असेल. विराट कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करत होता. सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या विराटला यामुळेच हा करार पुढे वाढविण्याची पेप्सीकडून विचारणा झाली असेल.
याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ” ज्या गोष्टी मी स्वतः खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसे काय खाण्यास सांगू शकतो. याआधी ज्या गोष्टींचा मी स्वीकार केला होता, ज्यांचा उल्लेख मी आता करू इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वतःला जोडू शकत नाही. ”
मार्च महिन्यात कॉर्नर स्टोन कंपनीचा सीईओ आणि विराटचा मॅनेजर बंटी साजदेह म्हणाला होता की विराटचं पेप्सी बरोबर करार ३० एप्रिल पर्यन्त आहे आणि सध्या आमची पेप्सीबरोबर करार वाढविण्यासाठी चर्चा सुरु आहे. पेप्सी हा एक मोठा आणि फायदेशीर ब्रँड आहे ज्याकडून आम्हाला मोठी कमाई झाली आणि आम्ही पुढेही हा करार सुरु राहण्यासाठी आशावादी आहोत.
विराट कोहली हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड असून तो एका दिवसाचे ५ कोटी रुपये घेतो. त्यांनतर बाकी सेलिब्रिटीचा नंबर लागतो.