३ वर्षांपूर्वी क्रिकेटचा महत्वाचा प्रकार समजला जाणाऱ्या कसोटी क्रिकेटच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ विराट तुझ्या गळ्यात पडली, किंबहुना ती तुझ्या गळ्यात पडावी म्हणून म्हणून तू तसे कष्टही घेतले. त्यानंतर तुझा कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून कामगिरीचा आलेख सतत चढताच राहिला.
ज्या देशात तुझ्या वयाचे असताना लोक आपले क्षेत्र काय असावे किंवा आपण कशात आपले उभे जीवन व्यतीत करावे; हे ठरवू शकलेले नसतात किंवा बेरोजगारी आणि अन्य समस्यांना तोंड देत असतात त्या काळात योग्य कष्ट आणि ध्येय ठेवून काम केले तर काय होऊ शकते याचा मोठा आदर्श तू या देशाला घालून दिला. एक चांगला खेळाडू, प्रेम शेवटपर्यंत निभावणारा प्रियकर, अमाप पैसे येऊनही या वयात त्याच योग्य नियोजन कस करावं हे जाणणारा उद्योगपती अशा अनेक गोष्टींमुळे तू आमचा आदर्श आहेच.
एक खेळाडू म्हणून तू खराब आहेस असं म्हणणारा माणूस क्रिकेट जाणकार नाही किंवा त्याला क्रिकेट कळत नसावं असं कुणीही म्हणेल अशी तुझी कारकीर्द. एकेकाळी सचिन बाद झाला की लोक टीव्ही बंद करत. आता तू फलंदाजीला आला की करतात. कारण त्यांना माहित आहे की विराट आहे म्हणजे सामना नाही पहिला तरी चालेल; कारण तो धावा करतोच. एवढा विश्वास तुझ्यावर आहे.
लोकप्रियतेत तू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कुठेही कमी नाही. कधी कधी तर तुझी हीच लोकप्रियता अनेक क्षेत्रातून आलेले आकडे पाहून मोदींपेक्षाही जास्त असल्याचे चटकन ध्यानात येते. तू जे पाणी पितोस त्याचा खर्च या देशात कधी ७-८ दिवस ज्या शहरात नळाला पाणीही येत नाही याची चर्चा ती लोकही आनंदाने करतात.
एवढं सगळं असताना कालचं तुझं वागणं खूपच खटकलं. तू एक खेळाडू म्हणून जेवढा मोठा आहेस तेवढाच कर्णधार म्हणून आहे असा जो भ्रम होता तो चटकन दूर झाला. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला तू ‘दक्षिण आफ्रिका भारतात किती वेळा विजयाच्या जवळ गेली?’ असा केलेला प्रतिप्रश्न आजपर्यंत तरी कोणत्या भारतीय कर्णधार विचारलेला मी तरी ऐकला नाही.
दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ मालिका ३-० ने जरी पराभूत झाला तरी जेवढे वाईट वाटले नसते तेवढे वाईट कालच्या तुझ्या पत्रकार परिषदेतील उत्तरांनी वाटले. भारताकडून जे २९० खेळाडू कसोटी खेळले त्यातील जेमतेम ३३ जणांना भारतीय संघाचं नेतृत्व करता आलं. शिवाय तुझ्याएवढे सामने भारताचे नेतृत्व करायला मिळालेले खेळाडू जेमतेम ६. म्हणजे तू एक कर्णधार म्हणून नक्कीच एक अनुभवी आहे.
कर्णधार म्हणून तुझ्या आक्रमकतेची कायम गांगुलीशी तुलना केली जाते. परंतु गांगुलीचा काळ जवळून पाहणारी माझ्यासारखी लोक नक्की सांगतील की तू नक्कीच तेवढा आक्रमक नाही. गांगुलीची रणनीती, त्याचे क्षेत्ररक्षण हे तुझ्यापेक्षा कधीही उजवे होते. जशास तसे उत्तर देणारा तो कर्णधार होता. याच्या उलट तुझी आक्रमकता आहे. जेव्हा समोरच्या टीमचा गोलंदाज जरी बाद झाला तरी तू जे काही वागतोस ते नक्कीच शोभा देणारे नसते. तुझ्या क्षेत्ररक्षणात गांगुली सारखी आक्रमकता कधीही दिसली नाही. डीआरएस घेताना तुझा एखाद्या शाळेत शिकणाऱ्या मुलासारखा उतावीळपणा सतत दिसतो.
शेवटी खेळ आहेस म्हणून तू आहे हेच तू कधी विसरतो की काय असे वाटते. रहाणेसारख्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवताना तू जो आकस दाखवला तो संपूर्ण देशाने नाही तर क्रिकेट जाणणाऱ्या जगातील सर्वच क्रिकेटप्रेमींनी पाहिला.एक कर्णधार हा संघाचा कणा असावा. त्याने सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे असे असतानाही तुला एखाद्या खेळाडूला संघात स्थान देताना तुझी त्या खेळाडूबरोबर असलेली मैत्री महत्वाची वाटते. हे नक्कीच चांगल्या कर्णधाराचे लक्षण नसावे. प्रत्येक चांगल्या गोष्टीत तू जेवढा आनंद व्यक्त करतो तेवढाच संयमाने तू वाईट काळातही सामोरा गेला पाहिजे.
ज्या देशात लोक दोन वेळच अन्न मिळेल की नाही याच्या संभ्रमात असतात त्या देशात तूला मिळणाऱ्या मानधनात तू तब्बल २००%ची वाढ मागतोस. विशेष म्हणजे ती तुला द्यायला तुझी संघटनाही तयार होते. या देशात कोणतही असं क्षेत्र नाही जिथे ३०%च्या वर एखाद्याला पगार किंवा मानधन वाढवून मिळत. त्या देशात तू वर्षाला १२ कोटीपर्यंत मानधनाची मागणी करतो आणि पुन्हा आम्ही देशासाठी खेळतो असंही म्हणायला तयार होतोस आणि आम्ही भाबडे प्रेक्षकही म्हणतो की तू देशासाठी खेळतो. एवढं भाग्य खूप कमी लोकांना मिळत.
याचमुळे १२० कोटींच्या देशातील सर्वात लोकप्रिय खेळाच्या कर्णधाराकडून अशी वक्तव्य येतात तेव्हा मनापासून दुःख होते. त्यामुळे तुझ्यासारख्या एका चांगल्या खेळाडूने एक चांगला कर्णधार म्हणूनही यापुढे आपली वाटचाल व्हावी म्हणून मनापासून प्रयत्न करावे. नाहीतर तू किती माहिती ठेवतो माहित नाही परंतु या देशात नम्रता असलेले अन्य खेळातील खेळाडूही आता लोकांचे आयकॉन बनायला लागले आहेत हे विसरू नकोस आणि ज्या देशाविरुद्ध तू सर्वाधिक धावा केल्यास तो आपला शेजारी श्रीलंका; त्यांच्या क्रिकेटची काय अवस्था झाली आहेस हेही विसरू नकोस.